www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता, मुंबईकरही ‘थर्टी फर्स्ट’चं सेलिब्रेशन पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास मोकळे झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी मुंबई हायकोर्टानं पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय. इतकंच नाही, तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या सुरक्षेची जबाबदारीही मुंबई पोलिसांना घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत.
‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली मात्र, मुंबई सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झाली होती. यावर, मुंबई पोलीस का सुरक्षा देत नाही? सुरक्षेच्या मुद्द्यावरून पोलीस आपली जबाबदारी झटकत आहेत, असा आरोप हॉटेल व रेस्टॉरंट असोशिएशननं करत मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर मंगळवारी मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिलेत.
मुंबई हायकोर्टानं 'आहार'नं दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत मुंबईत ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिलीय. त्यामुळं मुंबईतली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पार्टी करण्यासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. मात्र, कोर्टाने ‘इनडोअर पार्ट्यां’नाच पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी दिली असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे खुल्या पार्ट्यांना मात्र रात्री १२ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आलीय. त्यामुळं ‘थर्टी फर्स्ट’ला फन अनलिमिटेडची मजा आता तरूणांना घेता येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.