www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय… तुम्ही टॅक्सी मागवण्यासाठी फोन करता आणि कमी खर्चातली ‘काळी-पिवळी’ टॅक्सी तुमच्या सेवेसाठी हजर होते... हा अनुभव आता तुम्हीही घेऊ शकता.
सध्या, वातानुकूलित ‘फ्लिट टॅक्सी’चा पर्याय उपलब्ध नाही. पण, बऱ्याचदा खिशाकडे पाहून हा पर्याय रद्द करावा लागतो. म्हणूनच आता साध्या ‘काळ्या-पिवळ्या’ टॅक्सीजही तुमच्यासाठी एका कॉलवर उपलब्ध झाल्या आहेत. मुंबईकरांचा या सेवेला प्रतिसादही चांगला मिळतोय. तब्बल साडेतीन हजार टॅक्सी दूरध्वनीच्या एका हाकेत उपलब्ध होत आहेत. मुख्य म्हणजे टॅक्सीचे बिलही मीटरनुसार नेहमीसारखेच असल्याने कोणताही अतिरिक्त बोजा प्रवाशावर पडत नाही.
आयत्या वेळी `फ्लिट टॅक्सी` न आल्यामुळे अविनाश गुप्ता या `आयआयटीयन`चं विमान चुकलं होतं. या घटनेनंतर गुप्ता यांना दूरध्वनीवरून साधी टॅक्सी मागविण्याची सेवा पुरविण्याची कल्पना सुचली. त्यातूनच त्यांनी `बुक माय कॅब` ही सेवा सुरू केली. ६१२३४५६७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संकेतस्थळावरून आरक्षण करून ही टॅक्सी बोलावता येते. `बुक माय कॅब` या संस्थेने टॅक्सी विकत घेतल्या नसल्याने टॅक्सी चालकांना होणाऱ्या फायद्यातील काही टक्के वाटा फक्त संस्थेला जातो, तरीही या सेवेसाठी प्रवाशांवर कसलाही वाढीव भार पडत नाही. काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे नेहमीचे दरच या सेवेसाठी आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.