कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ

विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2017, 03:55 PM IST
कर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ title=

मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची हमी विरोधक घेणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी सरकारला धारेवर धरलं. दुष्काळ पडणार नाही, अवकाळी पाऊस पडणार नाही...याची हमी सरकार घेत असेल, तर आम्हीही आत्महत्या होणार नाहीत याची हमी देतो, असं धनंजय मुंडेनी म्हटले. अखेर गोंधळातच विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

दिल्लीला शिष्टमंडळ रवाना

शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झालंय. या शिष्टमंडळात शिवसेना मंत्र्यांचाही समावेश आहे. या दौ-यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी आपल्या दालनात सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र या बैठकीतही विरोधकांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. 

कर्जमाफी नाही तर अर्थसंकल्पही नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळं बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. आता दिल्लीकडून मदत मिळवण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे.