मुंबई : जगातल्या सर्वात उंच इमरतींपैकी एक असणाऱ्या दुबईतल्या 165 मजली बुर्ज खलिफा पेक्षाही उंच इमारत मुंबईच्या किनाऱ्यावर बांधण्याचा मनोदय केंद्रीय रस्ते परिवहन आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर पोर्ट ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर पडिक जमीन आहे. या जमिनीचा व्यावसायिक वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. या तयारीसंदर्भात बोलताना गडकरींनी हा मनोदय व्यक्त केला. 1873 साली बांधण्यात आलेलं मुंबईचं बंदर आणि त्यासोबत स्थापन झालेल्या पोर्ट ट्रस्टकडे मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर जवळपास अठराशे एकर जमीन आहे. ही जमीन सरकार दरबारी पडीक म्हणून गणली जाते.
मुंबईत बांधकमासाठी उपलब्ध जागेचा तुटवडा बघता आता पोर्ट ट्रस्टच्या या जमीनीचा सरकारनं व्यावसायिक फायदा करून घेण्याचं ठरवलंय....त्या अंतर्गत नितीन गडकरींनी मुंबईला पर्यटनासाठी येणाऱ्यांना समुद्र आणि शहराचं विहंगम दृश्य बघता यावं साठी मुंबईचा बुर्ज खलिफा बांधण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घरं देण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध आहे. पोर्ट ट्रस्टच्या जमीनीवर परवडणारी घरं बांधली जातीलच पण त्यासोबत शहराला नवी ओळख देण्याचाही सरकारचा विचार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान अद्याप गडकरींच्या या योजनेला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळालेली नाही. ही मंजूरी मिळाल्यावरच याविषयीच्या पुढच्या हालचाली सुरू होतील.