www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे. मात्र, मी BCCIची निवडणूक लढणार की नाही, याबाबत बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय.
सीएम यांनी एमसीएच्या मैदानात एंट्री घेतल्यानं आता शरद पवार विरुद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा सामनाही रंगणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्य म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखही माझगाव क्रिकेट क्लबचं सदस्य होते एमसीएच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी नियम धाब्यावर बसवून एका दिवसाच बदल्यांची ऑर्डर काढल्याने अधिकच चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यंमत्री चव्हाण यांनी या निवडीनंतर प्रतिक्रिया दिलेय. मी माझगाव क्रिकेट संघटनेचा सदस्य झालोय. बीसीसीआयची निवडणूक लढणार की नाही याबाबत काही बोलणार नाही. तसेच शरद पवारांबाबत बोलणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे पवारांविरोधात ही मुख्यमंत्र्यांची गुगली आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फायली पेंडिंग ठेवतात, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. त्यावरून राज्यात फाईल वॉर चांगलेच गाजले. मात्र एक फाईल अशी आहे, जिच्यावर पृथ्वीबाबांनी एका दिवसातच मंजुरीचा कोंबडा काढला. महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीबाबांनी अवघ्या काही तासात मंजूर केलेल्या या फाईलमध्ये नियम धाब्यावर बसवून बदल्या करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागातल्या तब्बल ५३ उप-जिल्हाधिका-यांच्या बदलीचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढलाय ८ ऑगस्ट रोजी. आता मुख्यमंत्र्यांकडे बदल्यांची ही फाईल कधी आली? पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी एक दिवस आधीच, म्हणजे ७ ऑगस्टला ही फाईल सादर केली. आणि दुस-याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलीसुद्धा. बरं या फाईलचा प्रवास फक्त पुण्याचे विभागीय आयुक्त ते मुख्यमंत्री असा झालेला नाही. तर, पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडून बदल्यांची ही फाईल आधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे गेली. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. तिथेही या फाईलला लगेचच हिरवा कंदील मिळाला. आणि हे सर्व घडलंय ते फक्त एका दिवसात. मुख्यमंत्री झाल्यापासून पृथ्वीराज चव्हाणांनी एका दिवसात फाईल मंजूर करण्याचं हे कदाचित पहिलंच उदाहरण असावं.
विशेष म्हणजे बदल्या करताना काही ठराविक उप-जिल्हाधिका-यांना मात्र वगळण्यात आलंय. पृथ्वीबाबांच्या कराडचे प्रांत अधिकारी म्हणून संजय तेली यांची तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. पण त्यांची बदली करणे तर राहिले दूर, उलट त्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आलीय. पूर्वी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे स्वीय सहायक असलेले विद्युत वरखेडकर यांची चार वर्षे झाली तरी पुण्याचे भूसंपादन उप जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली नाही.
प्रत्यक्षात अपवाद ठरलेले असे २० हून अधिक अधिकारी आहेत. याहूनही विशेष म्हणजे बदल्यांची फाईल ज्या प्रभाकर देशमुख यांनी दिली.त्यांना तर पुणे शहरात तब्बल दहा वर्ष झाली आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर कृषी आयुक्त आणि आता पुण्याचे विभागीय आयुक्त. अशी सलग दहा वर्ष प्रभाकर देशमुख पुण्यात ठाण मांडून आहेत. एकूणच बदल्यांची ही फाईल म्हणजे मोठं गौडबंगाल आहे. एवढ्या संदिग्ध फाईलवर मुख्यमंत्र्यांनी एकाच दिवसात सही केली कशी, हा त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.