आदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव हवंच; सीबीआय ठाम

आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण हेही एक प्रमुख आरोपी आहेत, असं प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयनं मुंबई हायकोर्टात आदर्श प्रकरणातून चव्हाण यांचं नाव वगळण्यास आक्षेप घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 2, 2013, 10:41 AM IST

www.24taas.com, मुंबई
आदर्श प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केलाय आणि फायदा मिळवला आहे. त्यामुळे आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण हेही एक प्रमुख आरोपी आहेत, असं प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयनं मुंबई हायकोर्टात आदर्श प्रकरणातून चव्हाण यांचं नाव वगळण्यास आक्षेप घेतलाय.
‘आपल्याला राजकीय षडयंत्र करून आदर्श प्रकरणात गोवण्यात आलंय. त्यामुळे आदर्श प्रकरणातील एफआयआरमधील आरोपींमधून माझं नाव काढावं’ अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. त्यावर सीबीआयनं कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अशोक चव्हाण हे आरोपी असल्याचं म्हटलंय. येत्या १८ एप्रिल रोजी विधानसभेत आदर्श प्रकरणाचा द्विसदस्य समिती अहवाल सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयनं अशोक चव्हाण हे या प्रकरणातील आरोपी असल्याचा पुनरुच्चार केल्यानं अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्यात.

सोसायटीतील फ्लॅट युध्दात शौर्य गाजवलेल्यांसाठी राखून ठेवलेले असताना, या सोसायटीतील चाळीस टक्के सदस्य म्हणून सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या होत्या. आदर्श प्रकरणात चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय.