www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ठाकरे घराण्यातला संपत्तीचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे... यातच, एकेवेळी `आपण राज आणि उद्धवला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू` असं म्हणणाऱ्या चंदूमामांनी आता `आपण उद्धव आणि जयदेव यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करू` असं म्हटलंय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळपास १०० कोटींच्या मालमत्तेवरून सध्या उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे या सख्या बंधुंमध्ये चांगलीच जुंपलीय. हा वाद न्यायालयातही पोहचलाय. यावरच चंदूमामा अर्थात चंद्रकांत वैद्य यांनी पुन्हा एकदा आपण मध्यस्थाची भूमिका निभावणार असल्याचं जाहीर केलंय. चंदूमामा हे बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांचे भाऊ आहेत.
उद्धव आणि जयदेवमध्ये काही गैरसमज झालेत... पण, हा न्यायालयीन वाद लवकरच संपेल... हा वाद संपविण्याचा प्रयत्न मी करेन... हा कौटुंबिक वाद कोर्टात आणि माध्यमांमध्ये गेल्यानं आपल्याला दु:ख झालंय, अशी प्रतिक्रिया चंदूमामांनी व्यक्त केलीय. `ठाकरे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मला जे काही करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे... याआधीही कोर्टाच्या बाहेर बसून आम्ही या विषयावर चर्चा केली होती. मात्र, जयदेव याने माघार घेतली नाही. मात्र, यावर लवकरच तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न राहील` असंही चंदूमामांनी म्हटलंय.
काय आहे जयदेव ठाकरेंचा आक्षेप...
बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रानुसार मालमत्ता एकूण मालमत्ता १४.८६ कोटी रुपयांची दाखवण्यात आली आहे. मात्र ही सर्व मालमत्ता बाळासाहेब एकट्या उद्धव ठाकरेंच्या नावावर करणं अशक्य असल्याचं जयदेव यांचं म्हणणंय. तसंच वांद्रेतल्या मातोश्री बंगल्याची किंमत बाजारभावानुसार ४० कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा जयदेव ठाकरेंनी केलाय. या व्यतिरिक्त बाळासाहेबांची मुंबई आणि मुंबईबाहेरही कोट्यवधींची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्याचा उल्लेखच मृत्यूपत्रात केला नसल्याचा दावाही जयदेव यांनी केलाय.
१३ डिसेंबर २०११ रोजी बाळासाहेब ठाकरेंनी आपलं मृत्यूपत्र बनवलं. मात्र या काळात ते आजारी असल्यानं मृत्यूपत्र बनवण्याच्या स्थितीत नसल्याचं जयदेव यांचं म्हणणंय. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी हे मृत्यूपत्र कोर्टात सादर करण्यात आलं. मात्र कोर्टानं आता या मृत्यूपत्राबाबत नातेवाईकांककडून हरकती मागवल्या आहेत. त्यावर जयदेव ठाकरेंनी आक्षेप नोंदवल्यानं बाळासाहेबांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.