मुंबई : कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावच्या महापालिकेला ९ कोटी रूपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून हे अनुदान देण्यात आलं आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्यासाठी ही कृपा दृष्टी असल्याची चर्चा आहे. विविध आरोपांमुळे नाराज नाही, तर संतप्त झालेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी दूर हा प्रयत्न असल्याची चर्चा मंत्रालयात आहे.
३० कोटींच्या लाचप्रकरणी गेल्या आठवडय़ात खडसे यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली. मागील तीन महिन्यापासून या निकटवर्तीयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लक्ष होते असे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केल्याने खडसे प्रचंड संतप्त झाले.
याविषयी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला साधी कल्पनाही दिली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर विविध आरोपांमुळे संतप्त झालेल्या खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते.