राज ठाकरेंना दिलं फूल, पण पगाराला 'काटे'

राज ठाकरे यांच्या भाषणानं खाकीमध्ये स्टेजवर जाऊन त्यांना जाहीररित्या गुलाबपुष्प देणाऱ्या प्रमोद तावडे यांच्या पगाराला या गुलाबाचे काटे चांगलेच रुतलेत. तावडे यांना आता तीन वर्ष पगारवाढ मिळणार नाही.

Updated: Dec 27, 2012, 03:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
राज ठाकरे यांच्या भाषणानं खाकीमध्ये स्टेजवर जाऊन त्यांना जाहीररित्या गुलाबपुष्प देणाऱ्या प्रमोद तावडे यांच्या पगाराला या गुलाबाचे काटे चांगलेच रुतलेत. तावडे यांना आता तीन वर्ष पगारवाढ मिळणार नाही. घटनेची चौकशी केल्यानंतर प्रमोद तावडे यांची पगारवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतलाय.
आसाम दंगलीच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकादमीच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने दोन निष्पापांचा मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांची बाजू घेतली होती. या भाषणानं भारावलेल्या ड्युटीवर असलेल्या प्रमोद तावडे यांनी स्टेजवर जाऊन राज ठाकरेंना गुलाबाचं फूल दिलं होतं.
राजकीय नेत्यांच्या व्यासपीठावर गेल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने त्या वेळी तावडे यांना फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्रशासनाने त्यांची तीन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहे.