मुंबई : मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. याबाबत त्यांनी विधानसभेत माहिती दिलीय आणि संरक्षण मंत्र्यांनाही पत्र लिहलंय.
भारताच्या फाळणीचं प्रतीक असलेलं हे स्मारक तात्काळ उद्धवस्त करावं अशी मागणी लोढा यांनी केलीय. जिना यांच्या याच निवासस्थानी पाकिस्तानचं महावाणिज्य दूतावास सुरु केलं जावं अशी मागणी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांनी केली होती.
हा बंगला सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. या बंगल्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर लाखो रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटलंय. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जिना यांचे वारसदार जिना हाऊसवर दावा करु शकत नसल्याचंही लोढा यांनी सांगितलंय.