मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे नोटबंदीच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुक रॅली काढण्यात येणार होती. मात्र, मोदींच्या दौऱ्यात कोणतेही विघ्न नको म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजर कैदेत ठेवले आहे.
पोलिसांनी निरुपम यांना इशारा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका. निरुपम वांद्र्यात मूक मोर्चा काढणार होते. त्याआधीच त्यांना घरात राहण्याचा पोलिसांनी सल्ला दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नोटबंदीविरोधातील आंदोलन पोलिसांनी चिरटून टाकल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.