मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे.
काही प्रकल्पांची कामं ही पावसाळ्यानंतरच सुरु होणार आहेत. अर्थात मुंबई -ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या प्रकल्पांचे भुमिपुजन करण्याचा सोपस्कार पार पाडला गेलाय. म्हणजेच आधीच्या सरकराच्या पावलावर भाजप-सेना सरकारनं पावलं टाकली आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
MUTP -3 चा शुभारंभ केला
47 नवीन लोकल सेवा, विरार - डहाणु रेल्वे मार्गाचे चौपरीकरण, पनवेल - विरार रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण , कळवा - ऐरोली रेल्वे लिंक
मात्र या चारही प्रकल्पांसाठी सध्या आर्थिक तरतूद नाही. येत्या फेब्रुवारीमधल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाणार, त्यानंतरच प्रत्यक्ष कामांना सुरु होणार.
मेट्रो 2 बी, मेट्रो 4 चे भुमिपूजन
दोन्ही प्रकल्पांसाठी सल्लागार कंपनीची नेमणुक झाली आहे. या प्रकल्पासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कंत्राट जाहिर झाल्यावर आणि पावसाळा लक्षात घेता पुढील वर्षी सप्टेंबरनंतरच मेट्रोची कामे प्रत्यक्षात सुरु होणार.
सागरी सेतू - MTHL चे भुमिपूजन
या प्रकल्पाचीही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकल्पाला कर्ज देण्याबाबातच्या वाटाघाटीही अंतिम टप्प्यात आहेत. प्रत्यक्ष काम पावसाळ्यानंतरच सुरु होणार आहे.
वांद्रे वरळी सी लिंक - बीकेसी, बीकेसी ते वाकोला उड्डाणपूल
निविदा प्रक्रियांचे काम सुरु झालं आहे. पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.