www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत रोज १५ दाम्पत्य आपला डाव अर्ध्यावरती मोडतायत, वर्षभरात ५ हजार ७४० जणांनी आपल्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे.
एकमेकांना समजून घेण्याआधी सोडचिठ्ठी घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. धकाधकीचं जीवन, एकमेकांना वेळ न देता येणं, कामाच्या धबाडग्यात घरी उशीरा पोहोचणं, अशी कारणं आज मुंबईकरांना जीवनसाथीपासून दूर नेत आहेत.
साताजन्माच्या गाठी अर्ध्यावरती सोडण्याचं प्रमाण मुंबईकरांमध्ये या आधी एवढं जास्त नव्हतं, मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. घटस्फोटासाठी अर्ज करण्याचं प्रमाण पुरूषांमध्ये जास्त आहे. मात्र आता तरूणींचं प्रमाणंही तुलनेनं वाढत चाललं आहे.
यात सर्वात जास्त सुशिक्षित आणि नोकरदार महिलांचा समावेश आहे हे विशेष.
सुशिक्षित तरूण तरूणींमध्ये वेस्टर्न कल्चरचं अनुकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नोकरदार महिलांना नोकरी म्हणजे इकडे आड तिकडे विहीर होतेय, जेव्हा नवरा आणि घरातील लोकंही तिला समजून घेण्यास कमी पडतायत.
मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात महिलांनाही समान संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे त्रास झाल्यास आपली वेगळी वाट धरण्यास महिला स्वतंत्र असतात, मात्र `एकला चालो रे`ची वाट महिलांप्रमाणे आज पुरूषांनाही कठीण होऊन बसली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.