www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहीम रोजच राबवली जाते पण, नवीन वर्षाच्या या सप्ताहात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्यानं दरवर्षी मुंबई ट्राफिक पोलीस या सप्ताहात ‘डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह’ ही मोहिम रात्री उशीरापर्यंत राबवतात. त्यामुळे केवळ या आठवड्य़ात नाही तर ‘कधीही दारु पिऊन गाडी चालवू नका’ असं आवाहन झी मीडिया मुंबईकरांना करतेय.
दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. पण, यांना चाप लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. दारु पिऊन तुम्ही गाडी चालवून नका नाही तर तुम्हाला ही अशा प्रकारे पोलीसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल, असं एसीपी विलास पवार यांनी बजावलंय.
२०१३ या वर्षांत १४ हजार ४३६ जणांवर दारु पिऊन गाडी चालवल्यानं कारवाई करण्यात आलीय तर गेल्या वर्षी १४ हजार १३३ जणांवर दारु पिऊन गाडी चालवल्यानं कारवाई करण्यात आली होती. यात ६५ टक्के दारु पिऊन मोटर सायकल चालवणारे आहेत. त्यातही २६ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या २६ टक्के आहे आणि २२ टक्के २१ ते २५ वयोगातील तरुणांची संख्या आहे. यातील काही तरुण हे उच्च शिक्षित असून नोकरीही करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यावर्षी जवळपास दोन लाख तरुण दारु पिऊन गाडी तर चालवत होतेच तेही हेल्मेट न घालता, अशी माहिती विलास पवार यांनी दिलीय.
मुंबईकरांनो नवीवर्षाचं स्वागत जल्लोषा कराच. पण, दारु पिऊन गाडी चालवू नका आणि जर दारु प्यायल्यानंतर प्रवास करणं भागच आहे तर, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा स्वत: ची गाडी असेल तर ड्रायव्हर सोबत घेऊन जा ही विनंती...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.