मुंबई : मुंबईत काळबादेवी इथं हनुमान गल्लीत इमारतीला आग लागलीय. दुपारी चार वाजता ही घटना घडलीय. या घटनेत पाच जण नागरिक तसंच अग्निशमन दलाचे तीन अधिकारी जखमी झालेत.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर 'एनडीआरएफ'ची टीम घटनास्थळी दाखल झालीय.
गेल्या सात तासांपासून अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
गोकूळनिवास असं इमारतीचं नाव आहे. अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसीरकर गंभीर जखमी झालेत. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्यात. त्यांना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.
अग्निशमन दलाचा आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच इमारतीत असलेल्या एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला... आणि आग आणखीनच भडकली. या स्फोटामुळे इमारतीचा एक भाग कोसळलाय. या इमारतीच्या रिपेअरिंगच काम सुरू असतानाच ही आग लागलीय.
कोसळलेल्या बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अग्निशमन दलाचे आणखी दोन ऑफिसर्स एस. जी. आमिन आणि एस. डब्ल्यू. राणे अडकलेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
अत्यंत अरुंद जागेत ही इमारत असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी येताय आहेत. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.