मुंबई : निधीअभावी राज्यात अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी रखडल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या एक कोटी सत्तर लाख कुटुंबियांना गहू आणि तांदूळ दिलं जात नाही आणि सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रॉकेल कोट्यात कपात केल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना धान्य आणि रॉकेल निधी अभावी दिले जात नसल्याचं बापटांनी मान्य केलं.
त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सदस्यांनी सरकारला धारेवर धरले. आमचे सरकार कर्जाखाली असतानाही या योजना राबवल्या. हे सरकार गोरगरीब आणि गरजू जनतेला स्वस्त धान्य कधी देणार का असा प्रश्न उपस्थित केला. यावर या संदर्भात कैबिनेट बैठकीत विषय मांडू असे आश्वासन बापट यांनी दिले.
नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार
महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यातला एकही थेंब गुजरातला जाऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलंय. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दमणगंगा-पिंजार नदीजोड प्रकल्पातील पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच जोपर्यंत सेना-भाजप सरकार सत्तेवर आहे, तोपर्यंत मराठी माणसाच्या बाजूनेच सरकार उभं राहिलं, आणि मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अजित पवारांच्या शिफारशीची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात गु्हेगारांना जरब बसविण्यासाठी शिक्षेचं प्रमाण वाढवण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितल. ड्रग्जची संपूर्ण साखळी उध्वस्त करणार असल्याचंही त्यांनी सांगितलय.
अजित पवारांच सरकारवर हल्लाबोल
राज्यातील कायदा सुव्य़वस्था, शेतक-यांचे प्रश्न यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरात तरी गुन्हे कमी झाले आहेत का, असा सवाल करत त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलय. दिवसाढवळ्या गोळीबार होतायेत, पोलीस ड्रग्जमध्ये अडकले आहेत, हे सांगतानाच सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांची अवस्था बघवत नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फसवी असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
तासगाव पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार?
माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटलांच्या निधनानं रिक्त झालेली तासगाव विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्षांनी उमेदवार देऊ नये, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे आर आर पाटलांच्या घरातल्या उमेदवारानं निवडणूक लढवली तर उमेदवार देणार नाही. मात्र बाहेरचा उमेदवार दिल्यास भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची भूमिका भाजपनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळं राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.