राकेश त्रिवेदी, मुंबई : मुंबई पोलिसांनी 'शिफू सनकृती'च्या पंथाचा संस्थापक सूनील कुलकर्णीला पोलिसांनी अटक केलीय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालणाऱ्या या शिफूच्या विरोधात आता जोरदार विरोध करण्यात येतोय. सुनील कुलकर्णी शिफू संस्कृतीच्या नावाखाली अनेक चांगल्या कुटुंबातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढून सेक्स आणि ड्रग्सचा रॅकेट चालवित होता, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.
नेमकी काय आहे शिफू सनकृती? कशी आहे शिफू सनकृतीची रहस्यमयी दुनिया? सोशल मीडियातून कसं वाढतेय शिफूचे जाळे? दिल्ली, मुंबईसह देशभरातील तरुणींभोवती कसं फेकलं जातंय शिफूचे जाळे?
शिफू सनकृतीचे गुढ सध्या दिवसेंदिवस वाढत चाललय. शिफू ही आध्यात्मिक संघटना नसून ऑनलाईन चालणारे एक नेटवर्क आहे. फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक नैराश्यात असलेल्या तरुणींना हेरण्यात येत. त्या तरुणींचे कार्यशाळा, फेसबुक, वेबसाईट अशा वेगवेगळ्या मार्गाने ब्रेन वॉश करुन त्यांना घरापासून दूर करण्यात येत... आणि मग परमात्म्याशी भेटीच्या ओढीच्या विचारात गुंग झालेल्या तरुणी ड्रग्ज आणि प्रसंगी सेक्सच्या जाळ्यात ओढलं जाते. घरच्यांकडून घातल्या जाणाऱ्या बंधनांचा बागुलबुवा आणि मानसिक आजाराची औषधे देऊन त्या तरुणींच्या वैचारिक क्षमतेवरच मानसिक बंधने घालण्यात येतात.
मुंबईसह सोशल मीडियावर सध्या शिफू सनकृतीबद्दल प्रचंड चर्चा आणि आरोप सुरु झाले आहेत. तरुणींना जाळ्यात ओढून सेक्स आणि ड्र्ग्जच्या मार्गात ओढल्याचा आरोप ठेवत मुंबई पोलिसांनी शिफू सनकृतीचा संस्थापक सुनील कुलकर्णीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सुनील कुलकर्णीच्या विरोधात फसवणूकीसह अनेक गुन्ह्याचे आरोप नोंदवण्यात आलेत. स्वताला पेशाने साईकेट्रिट म्हणवणा-या सुनीलला मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सुनील कुलकर्णीला 28 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी सुनावलीय.
2016च्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या मालाडमध्ये राहणा-या एका प्रतिष्ठीत कुटुंबाने कुलकर्णी आणि शिफू सनकृतीच्या विरोधात तक्रार केली आणि या प्रकरणाचा भंडाफो़ड झाला. या कुटुंबातील दोन तरुणी या सुनील कुलकर्णीमुळे शिफू सनकृतीच्या प्रभावात ओढल्या गेल्या. 23 वर्षीय एक कायद्याची विद्यार्थीनी आणि दुसरी 21 वर्षीय आर्कीटेक्चरची विद्यार्थीनी आहे. आणि या दोन्ही तरुणी आता शिफूच्या आहारी गेली आहेत. या दोन्ही तरुणींना घरी परतायचे नाही आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तरुणींना आपण आपल्या मर्जीने शिफूत सहभागी झालो असल्याचा दावा केलाय.
दोन्ही मुली या सज्ञान असल्याने पोलिसांकडे तक्रार करुनही कारवाई न झाल्याने त्या कुटुंबाने कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पण अशीच तक्रार घेऊन आणखी दोन कुटुंबानीही शिफू सनकृतीवर आरोप केले आणि हे सगळे प्रकरण आणखी गंभीर झाले. या प्रकरणातील सुनावणीवर प्रकरणाचे गांभीर्य पाहता कोर्टाने पोलिसांनाच फटकारले.
शिफू सनकृतीचा प्रणेता सुनील कुलकर्णी मात्र घर सोडणा-या तरुणींसाठी त्यांच्याच कुटुंबाला जबाबदार ठरलंय. सध्या मात्र शिफूच्या प्रभावातील अन्य तरुणींचा शोध घेण्यासाठी सुनील कुलकर्णीची चौकशीत तपास यंत्रणा गुंतलीय.