www.24taas.com, मुंबई
संपावर जाल तर कारवाई करू असा सज्जड इशारा सरकारनं गॅस पुरवठादारांना दिलाय. चर्चेनं प्रश्न सुटू शकतात, गॅस पुरवठादार संपावर गेले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी दिलाय.
एक ऑक्टोबरपासून सिलेंडरची घरपोच सेवा बंद करण्याचा इशारा सिलिंडर वितरकांच्या संघटनेने दिला आहे. सवलतीच्या दरामध्ये दिला जाणारा सातवा गॅस सिलिंडर नेमक्या कोणत्या दराने ग्राहकांना द्यायचा, याबाबतच्या कोणत्याही स्पष्ट सुचना या महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्र सरकारने न दिल्यास बंदचा इशारा देण्यात आलाय. याआधी 6 सिलिंडर सवलतीच्या दरात आणि त्यानंतरचे बाजारभावानुसार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पण याला विरोध झाल्यावर काँग्रेसशासित राज्यांनी 6 ऐवजी 9 सिलिंडर सवलतीत देणार असल्याची घोषणा केली होती.
पण सातव्या सिलिंडरच्या किंमतीबाबत अजुनही संभ्रमावस्था असल्याने वितरकांनी घरपोच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संपकरी गॅस पुरवठादारांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारनं दिलाय.