www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे.
वर्षभरापूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनं आणखी एक पुढं पाऊल टाकलंय. सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या गुटख्याच्या सेवनाची चटक शालेय विद्यार्थ्यांनाही लागली होती. मात्र, गुटख्यावर बंदी घातल्यानंतर हाच तरुण वर्ग मावा, खर्रा आणि सेंटेड तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाकडे वळला होता. आता राज्य सरकारने या सर्व तंबाखूजन्य पदार्थांवरही बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. गुटखा बंदीनंतर मावा, खर्रा आणि सुगंधी सुपारीची मागणी वाढली होती.
सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीच्या मिश्रणापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थाला काही भागात मावा तर विदर्भात तो खर्रा नावाने ओळखळा जातो. मावा आणि खर्ऱ्यासोबतच आता फ्लेव्हर्ड सुपारी, सेंटेड सुपारी आणि तंबाखू, अॅडिक्टीव्ह मिश्रीत तंबाखू आणि सुपारी याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे, अशी माहिती अऩ्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय.
गुटखाबंदी नंतर तंबाखू शौकिनांना मावा आणि खर्ऱ्याची चटक लागली होती आणि त्यामुळेच त्याची विक्रीही वाढली होती. पण आता सरकारने त्यावर बंदी घालण्याच्या निर्णय घेतलाय. मात्र, त्यामुळे मावा, खर्ऱ्याच्या विक्रीवर खरंच लगाम लागणार का? हाच खरा प्रश्न आहे. कारण राज्यात गुटखा बंदी असतांनाही २२ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्यातील १२ कोटी रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. बाहेरील राज्यातून हा माल छुप्या पद्धतीने राज्यात विक्रीसाठी येत असल्याने त्याला प्रतिबंध घालणे सरकारला अवघड जातंय. त्यामुळे देशभरच गुटखाबंदी व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालवले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.