www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या परळ इथलं कामगार विमा महामंडळाचे एमजीएम हॉस्पिटल सध्या वादाच्या भोव-यात सापडलंय. नव्याने भरती झालेल्या 36 मराठी कर्मचा-यांना इथं धड कामही करु दिले जातं नाही आणि पगारही दिला जात नाही. यामुळं मुलांची नोकरी धोक्यात सापडलीय. विशेष म्हणजे हॉस्पिटलमधील जुने कर्मचारीच त्यांना काम करण्यापासून रोखत आहेत.
मुंबईतील परळच्या एमजीएम हॉस्पीटलच्या बाहेर उभ्या असलेल्या 36 मराठी मुलांची सरकारी नोकरी सध्या धोक्यात आलीय. विशेष म्हणजे त्यांच्या नोकरीवर गदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत ते हॉस्पीटल प्रशासन आणि तेथील जुने कर्मचारी. हॉस्पीटल प्रशासनाने ईएसआयसीच्या मेडिकल कॉलेजसाठी मागील वर्षी रितसर जाहीरातीद्वारे मुलाखती घेऊन पॅरामेडिकल पोस्टसाठी या मुलांची भरती केलीय. वर्षभरापासून ते कामही करत होते. परंतु गेल्या 1 एप्रिलला हि मुलं हॉस्पीटलमध्ये कामावर रुजू होण्यासाठी गेली असता जुन्या कर्मचा-यांनी त्यांना तिथून हाकलून लावले आणि कामावर रुजू होण्यास मज्जाव केला. यानंतर अनेकवेळा असा प्रकार घडल्यानं ही मुलं दहशतीमध्ये आहेत. या मुलांची भरती ईएसआयसीच्या मेडिकल कॉलेजसाठी झालीय. त्यांनाही या मुलांची गरज आहे. परंतु या तिढ्यामुळं तेही हतबल झालेत.
ईएसआयसीचे हे हॉस्पीटल ट्रस्ट चालवत असल्यानं जुन्या कर्मचा-यांना आपल्याच मुलांना याठिकाणी भरती करायचंय आणि हॉस्पीटल प्रशासनही या कर्मचा-यांना पाठिशी घालत असल्याचं सांगण्यात येतंय. 1 एप्रिलपासून मेडिकल सुपरिटेंडेंट या मुलांना सहीसाठी ना हजेरीचे मस्टर देतायत ना गेल्या 4 महिन्यांचा पगार.
ज्यांनी संपूर्ण आयुष्य अन्यायाविरोधात लढण्यासाठी घालवले, त्या महात्मा गांधीच्या नावाने चालणा-या या हॉस्पीटलमध्ये मुलांवरचा हा अन्याय इथल्या प्रशासनाला शोभणारा नाही. त्यामुळं या मराठी मुलांच्या अन्याय निवारणासाठी मराठीचा कैवार घेतलेल्या राजकीय पक्षानीच पुढं येण्याची गरज आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.