जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 124 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. त्यातले 122 जण मुंबईकर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्यांसंबंधी राज्य सरकार जम्मू काश्मीर सरकारच्या संपर्कात आहे. अडकलेल्यांमध्ये डोंबिवलीच्या शिंदे परिवाराचाही समावेश आहे.
गेल्या आठवड्यात विक्रांत शिंदे, अर्चना शिंदे आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी विव्हीया शिंदे काश्मीरला फिरायला गेले होते. विक्रांत शिंदे हे सेंट जोसेफ शाळेचे ट्रस्टी असून त्यांची पत्नी त्याच शाळेत मुख्याध्यापिका आहे. याखेरीज ग्रामविकास खात्याच्या दोन अधिका-यांचा समावेश आहे. बचत गटाच्या प्रदर्शनासाठी ते 4 तारखेला काश्मीरला गेले होते.
श्रीनगरमध्ये हे प्रदर्शन होतं.यात पराग भोसले हे भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देखील आहेत त्यांच्याशी अद्याप कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान बोरिवलीच्या अग्रवाल आणि मंगल कुटुंबातलेही 8 जण श्रीनगरमध्ये अडकले आहेत. तसंच केसवानी कुटुंबातलेही 9 जण श्रीनगरमध्ये अडकले आहेत. मात्र हे सर्वजण सुरक्षित असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळतेय.
वायुदलाची 61 चॉपर्स, तसंच मालवाहू विमानांनी आत्तापर्यंत बचावकार्यासाठी 354 फे-या केल्या आहेत. संरक्षण दलांचे जवळपास एक लाख जवान बचावकार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हवामानात गेल्या काही तासांत सुधारणा झालीय, त्यामुळे श्रीनगर आणि जवळपासच्या काही शहरात पाण्याची पातळी खालावली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.