www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना पाहाण्यासाठी शिवसेना नेते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे देखील वानखेडेवर जाणार आहेत. जोंशीच्या उपस्थितीमुळे वानखेडे स्टेडियमवर आणखी एक वेगळा `सामना` पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
२४ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीनंतर सचिन तेंडुलकर निवृत्त होतोय... सचिन अखेरचा कसोटी सामना खेळत असताना वानखेडेवर रंगणार आणखी एक सामना रंगण्याची चिन्ह आहेत... कारण, शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी सामन्याला हजेरी लावणार आहेत... वादानंतर पहिल्यांदाच जोशी-उद्धव ठाकरेंच्या भेटीचा योग येणार का? असा प्रश्नही त्यानिमित्तानं उपस्थित झालाय.
एकीकडे मास्टर ब्लास्टर आपल्या स्ट्रोक्सनी विंडीज संघाच्या चिंधड्या उडवत असताना, वानखेडेच्या व्हीव्हीआयपी बॉक्सकडेही राजकीय निरीक्षकांच्या नजरा खिळणार आहेत. अन्य राजकीय नेत्यांप्रमाणेच सचिनचा अखेरचा कसोटी सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी मनोहर जोशी देखील पहिल्या आणि अखेरच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. सरांची क्रिकेट रुची सर्वांनाच ठाऊक आहे. जोशींनी दोनदा बिनविरोध तर दोनदा निवडणूक जिंकून, असं सलग चार टर्म ‘एमसीए’चं अध्यक्षपद भूषवलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी वानखेडेवर अनेकदा क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेतलाय. बाळासाहेब, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांच्यासाठी वानखेडेवर खास जागा राखीव असायची, असंही सांगितलं जातं. युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री असलेल्या सरांनी ‘राजकारणी विरुद्ध क्रिकेटियर्स’ असा प्रदर्शनीय सामनाही खेळवला होता.
सूर हरवलेल्या खेळाडूप्रमाणे जोशी सरांचा वानखेडेच्या व्हिव्हिआयपी बॉक्समध्ये बसून राजकारणात हरवलेला सूर पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरचा राजकीय सामनाही रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.
उद्धव ठाकरेंवर टीका केल्यापासून त्यांना रोषाला सामोरं जावं लागतंय आणि शिवसेनेत संघर्षही करावा लागतोय. दसरा मेळाव्यात झालेल्या प्रकारानंतर त्यांची उद्धवशी भेट झालेली नाही, झाला तो फक्त पत्रप्रपंच... नजीकच्या काळात जोशी-उद्धव ठाकरे भेटीची शक्यताही धूसर आहे. मात्र, या भेटीसाठी सचिनच्या अखरेच्या कसोटीचा योग जुळू शकतो.
उद्धव जर सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेले तर व्हीव्हीआयपी बॉक्समधलं दृश्य सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारं असू शकतं. एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचा बॉक्समधला शेजार उद्धव ठाकरे स्वीकारतात की टाळतात? याबाबत उत्सुकता असेल.
एकीकडे सचिन आपल्या क्रिकेट कारकीर्दीला जय महाराष्ट्र करत असताना दुसरीकडे सध्या आपला फॉर्म गमावलेले सर रिटायरमेंट टाळण्यासाठी राज्यसभा उमेदवारीचे पॅड बांधून तयार आहेत. २४ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सचिन क्रिकेटमधून निवृत्त होतोय, तर गेली 46 वर्षे शिवसेनेमध्ये असलेले मनोहरपंत पॅव्हॅलियनमध्ये बसायला तयार नाहीत... त्यामुळे सचिन आणि सरांसाठीही त्यांच्या करिअरमधली ही अत्यंत महत्त्वाची कसोटी असणार आहे, एवढं निश्चित.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.