मुंबईत चार महिलांच्या हत्या; गूढ कायम!

सांताक्रुझमधल्या रहेजा कॉलेजजवळ आज सकाळी एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलाय. या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचं समोर येतयं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 18, 2012, 03:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत सिक्युरिटी गार्डने तरुणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका तरुणीची हत्या झाल्याचं आढळून आलंय. सांताक्रुझमधल्या रहेजा कॉलेजजवळ आज सकाळी एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलाय. या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचं समोर येतयं.
सांताक्रुझ पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत आत्तापर्यत अशा प्रकारच्या तीन घटना घडल्याचं समोर येतंय. या आधी कुरार, मलाड-मालवणी आणि मीरारोडमध्ये अशा प्रकारे महिलांचे मृतदेह आढळलेत. या तीनही महिलांची शरीरावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचं समोर येतंय. त्यामुळे यात एखाद्या सिरीअल किलरचा तर हात नाही ना? अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. त्यादृष्टीने पोलिसांनी आता तपासाला सुरूवात केलीये.
गेल्या पंधरा दिवसांत मुंबईत महिलांच्या हत्येच्या चार घटना घडल्यायत... तरुणींच्या हत्येचं गूढ काय हा प्रश्न अनेकांना सतावतोय.
पंधरा दिवसांत चार महिलांची हत्या
३ ऑगस्ट - मीरारोड स्टेशनजवळच्या खाडीत महिलेचा मृतदेह
७ ऑगस्ट - कुरारच्या पिंपरीपाडामध्ये तरुणीची हत्या
१६ ऑगस्ट - मालवणीच्या अंबुजावाडीत गळा चिरून तरुणीची हत्या
महत्त्वाची बाब म्हणजे, या सगळ्या महिलांचे मृतदेह हत्या करुन निर्जन ठिकाणी टाकले गेलेले आढळले. तसंच सगळ्या हत्यांसाठी एकच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलीय. या सगळ्या महिलांवर धारदार हत्यारानं वार करण्यात आले होते. हत्या झालेल्या एकाही महिलेची अजून ओळख पटलेली नाही. तसंच पोलिसांना अजून एकाही हत्येचा छडा नाहीय, हे विशेष.