मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनानं महायुतीतील पक्षांना जागांची जास्त हाव न धरण्याचा इशारा दिलाय. महायुतीतील सर्वच पक्षांनी महायुतीचे राज्य आधी आणावे जागांची हाव न करता ज्याची जेथे ताकद आहे तेथे त्याने लढावे व जेथे कमी जोर आहे तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे असा इशारा सामनानं अग्रलेखात दिलाय.
महायुतीचे राज्य आधी आणावे ही जिद्द सगळ्याच मनसबदारांत वाढीस लागली आहे. एक-दोन जागांचे वाटप ही काही महायुतीतील मित्रपक्षांची किंमत होऊ शकत नाही. कार्यकर्ते अधिकच्या जागांचा आग्रह धरीत असतात व प्रत्येक राजकीय पक्षाला पसरण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण पसरताना एकमेकांच्या तंगड्या एकमेकांत अडकल्या तर प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेऊन सटकतो. तेव्हा ज्याची जेथे ताकद तेथे त्याने लढावे व जेथे कमजोर तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे, असे सामनात म्हटले आहे.
शिवसेना-भाजपची सत्ता ही महायुतीची सत्ता आहे. महायुती महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करते. मित्रवर्य रामदास आठवले यांनी सांगितले आहे की, ‘रिपाइंला दोन आकडी जागा मिळाल्या पाहिजेत नाही तर आम्ही वेगळा मार्ग शोधू.’ आठवले हे संयमी व समंजस नेते आहेत. भीमशक्तीचा सन्मान राखण्यासाठीच आठवले यांना त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नसताना राज्यसभेवर पाठविण्यात आले व यापुढेही भीमशक्तीचा मानसन्मान नक्कीच राखला जाईल, असे अग्रलेखात म्हटले आहे.
‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांच्यासारखे समंजस नेतृत्वही महायुतीची ताकदच आहे. आज त्यांना मनाप्रमाणे जागा मिळाल्या नसतील, पण उद्याच्या सत्तेत मेटे यांच्यासारखे नेते मोठी कामगिरी पार पाडू शकतात. जानकर हेदेखील बारामतीच्या लढाईनंतर राज्याचे मोठे नेते झाले आहेत व त्यांचे मोठेपण दिवसेंदिवस वाढीस लागणार आहे. जानकर यांनीही जागांच्या चक्रव्यूहात न फसता कॉंग्रेस-राष्ट्रवादीविरुद्धच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावावी अशी जनतेची इच्छा आहे.
महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन व्हावे. राज्यातून कॉंग्रेसचा नायनाट व्हावा. मराठी जनतेच्या आशा-आकांक्षा सफल व्हाव्यात आणि महाराष्ट्र हिंदुत्वाच्या विचाराने भगवा व्हावा. हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. त्या शिवरायांच्या विचारांची शिवशाही यावी हा निर्धार तर पक्का आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेच आहे. आता शिवशाहीच्या निर्धाराला फाटे फोडू नका!, असे बजावण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.