विरार : किरकोळ वादातून एका इसमान पत्नी आणि दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार करून स्वत:चंही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
विरार पूर्वेकडील मनवेल पाडा इथल्या विहार कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडलीय. कृष्णा हा भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता. तर पत्नी कल्पिता ही मुंबईच्या भाभा रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. अथर्व आणि जाई हे सेंट पीटर शाळेत शिकत होते.
शनिवारी कृष्णा आणि त्याची पत्नी कल्पिता यांच्यात घरातच किरकोळ कारणावरून वाद झाला... आणि रागातच कृष्णानं हे पाऊल उचललं. कृष्णानं पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केले... यावेळी लहानग्या जाईनं हे दृश्यं पाहिलं. त्यानंतर कृष्णानं मुलगी जाई (१० वर्ष), मुलगा अथर्व (७ वर्ष) यांच्यावरही धारधार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्यानं स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलीय.
यानंतर पत्नीचा उपचारादरम्यान संजीवनी रुग्णालयात मृत्यू झाला तर कृष्णा, जाई आणि अथर्व यांच्यावर विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोसायटीतील कुणीही मदतीला नाही
धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी रात्री 10 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. घरातल्या आरडाओरडीमुळे सोसायटीतले लोक कृष्णा यांच्या घरासमोर जमा झाले. मात्र, त्यांच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाहीत.
तब्बल एक तास हे कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत यांनी कार्यकर्ते व पोलिसांना बोलावून उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.