मुंबई : मराठा क्राती मोर्चांना उत्तर देण्यासाठी दलितांचे प्रतिमोर्चे काढण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात काही नेते आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही दलित नेते सामंजस्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून राज्यात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्व स्तरावर मराठा मोर्चाची चर्चा आहे. मराठा मोर्चांमध्ये अॅस्ट्रोसिटी कायद्यात बदल करण्याची मागणीही होत आहे. दलितांचा या मागणीला विरोध आहे. त्यामुळे मराठा मोर्चाविरुद्ध दलितांचे प्रतिमोर्चे काढण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.
मात्र, यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडण्याची, मराठा विरुद्ध दलित असा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. मात्र असा संघर्ष चिघळू नये म्हणून काही दलित नेते सामंजस्याची भूमिका घेत आहेत. दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मात्र या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या या भूमिकेमुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडेल याचे भानही आठवले यांनी ठेवले नाही.
राज्यात मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपा आणि संघाचा प्रयत्न असल्याचे आरोप होतायत. प्रकाश आंबेडकर यांनीही तसा आरोप केलाय. मात्र भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे.
या मोर्चांमुळे आपल्या पक्षावर काय परिणाम होईल याची चिंताही आता प्रत्येक पक्षाला भेडसावत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चांच्या परिणामाबद्दल भाजपमधील मराठा नेत्यांशी चर्चा केली. मराठा समाजाचा मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी चर्चा करण्याचीही तयारी दर्शवली आहे.
मोर्चे आणि त्याला उत्तर म्हणून दलितांचे प्रतिमोर्चांचे काढून राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेण्याऐवजी त्याचा राजकीय लाभ उठवण्याचाही काही जण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे मोर्चे राजकीय कटशहाचे साधण बनू नये आणि राज्यातील वातावरण बिघडू नये, अशी मागणी होत आहे.