मराठी पदार्थांना राजकीय 'फोडणी'

राजकीय वादात मराठी पदार्थांना सध्या सुगीचे दिवस आलेत. आंदोलनासाठी मराठी पदार्थांचा शस्त्र म्हणून वापर होत असल्यानं त्यांनाही ग्लॅमर मिळालंय...नव्यानं उदयाला येत असलेल्या फूड सेन्सॉरशिपचा पाहूयात एक रिपोर्ट...

Updated: Jul 24, 2015, 04:27 PM IST
मराठी पदार्थांना राजकीय 'फोडणी' title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : राजकीय वादात मराठी पदार्थांना सध्या सुगीचे दिवस आलेत. आंदोलनासाठी मराठी पदार्थांचा शस्त्र म्हणून वापर होत असल्यानं त्यांनाही ग्लॅमर मिळालंय...नव्यानं उदयाला येत असलेल्या फूड सेन्सॉरशिपचा पाहूयात एक रिपोर्ट...

कुणी म्हणतं कांदे पोहे घ्या , कुणाला वडा पाव हवा , तर कुणाची चक्क नॉनव्हेज पार्ट्या करण्याची तयारी सुरु आहे. रिमझिम पावसानं वातावरण गारेगार झालं असताना, मराठी पदार्थांनाही राजकीय फो़डणी दिली जातेय...

एकीकडे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळ, शेतक-यांच्या समस्या, कर्जमुक्ती, चिक्की घोटाळा, बोगस पदवी अशा मुद्यांवरुन तेच तेच राजकारण करणा-या नेत्यांनाही कदाचित कंटाळा आला असावा...फॉर ए चेंज म्हणून की काय लोकांनी काय खावं काय, खाऊ नये यावरुन राजकीय नेत्यांनी चक्क लढाई सुरु केलीय.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मरीन लाईन्सवरील वादग्रस्त जिमला कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांचा स्वाभिमान वडा टफ फाईट देतोय. तर शिवसेनेच्या शिववड्याला कॉंग्रेसच्या कांदेपोह्यांनी फो़डणी दिलीय.. 

दहिसरमध्ये नुकत्याच झालेल्या शाकाहार-मांसाहार वादानं मनसेलाही गुदगुल्या झाल्याहेत. या वादानं मराठी अस्मितेचा नवा मुद्दा मनसेच्या हाती लागलाय...त्यामुळे कुष्णकुंजवर झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत गुजराती बहुल भागांमध्ये नॉनव्हेज पार्ट्यांचं आयोजन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत...पुढचे दोन रविवार मनसे कार्यकर्ते नव्या पद्धतीच्या या खळ्ळ खट्याकमध्ये बिझी राहाणार आहेत...

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले याआधीच मराठी पदार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेत.. सर्व हॉ़टेल्समध्ये मराठी पदार्थांना सन्मानाची वागणूक देण्याची मागणी केलीय...हॉटेल मालकांच्या संघटनेनंही आठवलेंचे आदेश शिरसावंद्य मानत मेन्यू कार्डवर मराठी पदार्थ झळकवण्यास सुरु केलीय...

काही म्हणा, राजकीय नेते आंदोलनाच्या मुद्यासाठी का होईना फूड कॉशियस झालेत...आणि मराठी पदार्थ्यांना सध्या सुगीचे दिवस आलेत...अशा वातावरणात आस्वादच्या मिसळीनं साता समुद्रापार झेंडा रोवल्यानं, आता वडा पाव-कांदेपोहे आणि कोंबडीवड्याच्या आशा  पल्लवित झाल्याहेत..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.