www.24taas.com, कृष्णात पाटील. झी मीडिया,मुंबई
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय उद्यान व्हावं ही माझी कल्पना आहे. मात्र त्या उद्यानाला बाळासाहेबांचे नाव दिल्यास त्याचं स्वागत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलयं.
रेसकोर्सच्या भूखंडाची लीज महिनाअखेर संपणार आहे. त्यामुळं हा भूखंड मुंबई महापालिकेच्या ताब्यात जाणार आहे. या भूखंडावर आता आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची चर्चा सुरु झालीये. लीज वाढवून दिली जाऊ नये यासाठी मुंबईचे महापौर सुनील प्रभू प्रयत्नशील आहेत.
रेसकोर्सचा इतिहास
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सचा ९९ वर्षांचा भाडेपट्टीचा करार संपल्यानंतर महापालिकेनं हे मैदान ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यानं उभारण्याच्या सूचना महापौर सुनील प्रभू यांनी केलीय. मात्र या उद्यानाच्या निमित्तान बाळासाहेबांच्या स्मारकाचाही घाट शिवसेनेनं घातल्याचं पुढं आलंय.
यानिमित्तानं रेसकोर्सचा इतिहास पुन्हा एकदा ताजा झालाय. यावरचा हा विशेष रिपोर्ट....
सव्वा दोनशे एकर परिसरात पसरलेला मुंबईतील हा महालक्ष्मी रेसकोर्स सामान्य लोक फक्त हिंदी चित्रपटांमध्येच पाहत आलेत. जर मुंबईच्या महापौरांच्या इच्छेप्रमाणं सर्व सुरळीत पार पडले तर सामान्य मुंबईकरही या रेसकोर्सच्या जागेत मनसोक्त फिरु शकणाराय. 99 वर्षांच्या करारावर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ही जागा बीएमसीनं दिलीय. ज्याची मुदत 31 मे रोजी संपणार आहे. त्यामुळं ही जागा ताब्यात घेऊन याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याची कल्पना महापौरांनी मांडलीय.
महालक्ष्मी रेसकोर्स 1883 मध्ये बांधण्यात आला. यासाठी सर कुस्रो वाडिया यांनी जमीन दान केली. बीएमसीच्या मालकीचा असलेला हा रेसकोर्स 1914 मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या भाडेपट्टी करारावर देण्यात आला. ज्याची मुदत 31 मे रोजी संपणार आहे. सव्वा दोनशे एकर परिसरात पसरलेल्या या जागेची बाजारभावानुसार किंमत सुमारे 15 हजार कोटी रुपये होते.
मोजक्या उच्चभ्रू लोकांच्या मौजमजेसाठी चालणा-या घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारी बेटींग. एवढ्यापुरता मर्यादित वापर आतापर्यंत रेसकोर्सचा होत आलाय. बीएमसी प्रशासनानं ही जागा ताब्यात घेऊन त्याचा विकास केल्यास ही बाब सामान्य मुंबईकरांच्या मनाला भावणारी अशीच आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.