दिनेश दुखंडे, मुंबई : गिरगावमधलं मेट्रो ३ चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय. मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या, अशी नोटीस एमएमआरसीएनं दादरमधील रहिवाशांना दिली आहे. त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत. मनसेनं याप्रकरणी दादरवासियांच्या पाठिशी उभं राहाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, सत्तेत असताना तुम्ही विरोध करत आहेत, हे तुमचं अपयश आहे, असा थेट आरोप मनसेनेने केलाय.
नारायण हाऊस आणि कॉर्नर व्ह्यू. सुख दुःखात एकमेकांचा कधीही शेजार न सोडलेली एक चाळ तर दुसरी इमारत. दोघीही दादरमधल्या मराठमोळी परंपरा जपणा-या प्रतिनिधी. पण आता या दोघींच्याही अस्तित्वावर संकट आलंय. चाळ आणि इमारतीची जागा तसंच आजूबाजूचा परिसर एमएमआरडीएला आपल्या मेट्रो ३ या प्रकल्पासाठी हवाय.
प्राधिकरणानं या चाळी आणि इमारतीच्या मालकांना तसंच रहिवाशांना नोटीस बजावलीय. १५ दिवसांच्या आत प्राधिकरणाला या नोटीशीवर मालक आणि रहिवाशाचं उत्तर हवंय. एमएमआरसीएच्या या नोटीशीमुळं रहिवाशांच्या पायाखालची वाळूच सरकलीय.
याप्रकरणी मनसे रहिवाशांच्या बाजूनं उभी राहिलीय. स्थानकं असू दे , वा कारशेड. मेट्रो ३ प्रकल्पाचं कौतुक कमी आणि वादच जास्त, अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी गिरगावकरांवर घोंघावत असलेलं या प्रकल्पाचं वादळ आता दादरच्या दिशेनं सरकलंय. त्याचा मुकाबला करण्यासाठी दादरकर सज्ज झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.