नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नेत्यांना साधं राहणीमान ठेवण्यास सांगतात. पण महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सगळ्यांना तेव्हा हैराण केलं जेव्हा ते त्यांची अलीशान लँबोर्गिनी कार घेऊन विधानसभेत पोहोचले. या कारची किंमत जवळपास ५.५ कोटी आहे. नारंगी रंगांची ही लँबोर्गिनी घेऊन जेव्हा आमदार मेहता हे विधानसभेत पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार मेहता यांनी पत्रकारांना पाहून यूटर्न घेतला आणि विधानसभेत जाण्याऐवजी तेथून निघून गेले.
भाजपचे आमदार जेव्हा विधानभवनात पोहोचले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली. त्यांची कार ही इतर आमदारांसाठीही चर्चेचा विषय ठरला. कोणाला कारची किंमत तर कोणाला कारची वैशिष्ट जाणून घेण्याची इच्छा झाली. अनेकांनी तर गाडीसोबत सेल्फीही घेतली. यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांना या गोष्टीची जाणीव झाली की, हे प्रकरण आता वादात तर येणार नाही ना? त्यामुळे त्यांनी मेहतांना तेथून गाडी घेऊन निघून जाण्याचा इशारा केला. मेहतांना पण ती गोष्ट कळाली आणि त्यांनी ही तेथून निघून जाणं पसंत केलं.