www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवकालीन सुवर्ण नाण्यांवरुन महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झालाय. मनसेनं या सुवर्ण नाण्यांच्या लिलावाला आक्षेप नोंदवत हा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय.
‘राजगोर ऑक्शन’ या खाजगी कंपनीनं रविवारी ताज हॉटेलमध्ये भारताच्या प्राचीन दुर्मिळ अलंकारांच्या लिलावाचं आयोजन केलंय. या लिलावात शिवकालीन नाण्यांचाही लिलाव होणार आहे. त्यामुळे या लिलावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनंनं आक्षेप घेतलाय. शिवकालीन नाणी महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव असल्यानं ती महाराष्ट्राबाहेर जाता कामा नये, अशी भूमिका मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मांडलीय.
याप्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून ही नाणी राज्य सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावीत किंवा ती खरेदी करावीत, अशी मागणी देशपांडे यांनी केलीय.
तसंच ‘राजगोर ऑक्शन’ कंपनीचे दिलीप राजगोर यांनाही पत्र पाठवून या नाण्यांची विक्री महाराष्ट्राबाहेर करु नये अशी मागणी त्यांनी केलीय. अन्यथा हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेनं दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.