www.24taas.com, मुंबई
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांचे मोनो रेल्वेतून प्रवास करण्याचं स्वप्न साकार होणार आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मोनोरेल्वेचा पहिला मार्ग चेंबूर ते वडाळा प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सुमारे नऊ किमीच्या या मार्गावर सात स्टेशन आहेत. सध्या मोनोरेल्वेच्या विविध चाचण्या युद्धपातळीवर सुरु असून स्टेशनचे बांधकामही जोरात सुरु आहे. मोनो रेल्वेचे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच वापरले जात असल्यानं मोनो रेल्वेच्या प्रवासाचं सर्वांनाच आकर्षण राहिलं आहे.
जानेवारी २००९ ला मोनोरेल्वेच्या बांधकामाला सुरुवात झाली. २०११ ला पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र, तब्बल दोन वर्ष उशिरा का होईना मोनो रेल्वे वाहतूकीसाठी खुली होत आहे. तर दुसरा ११ किमीचा वडाळा ते जेकब सर्कल हा टप्पा पुढील वर्षी म्हणजे २०१४ ला पूर्ण होणार आहे.
मेट्रो मात्र लटकलेलीच...
एकीकडे मोनो रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत असतांना मेट्रो रेल्वे कधी पूर्ण होणार असा प्रश्न सर्व उपस्थित होत आहे. ११ किमी लांबीचा वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर असा मुंबईतील पहिला मेट्रो रेल्वेचा मार्ग आहे. ८ फेब्रुवारी २००८ ला मेट्रोच्या बांधकामाला सुरुवात झाली. २०११ या वर्षी हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला होणार अशी अपेक्षा होती. मात्र, सातत्याने मेट्रोची डेडलाईन पुढे ढकलली गेली आहे. अखेर २०१३ म्हणजे या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत मेट्रोच्या चाचण्या पूर्ण होतील, असा दावा केला जात आहे. तेव्हा यावर्षाच्या अखेरीस का होईना मेट्रो रेल्वे सुरु होणार अशी मुंबईकरांना आशा आहे.