www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे.
आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.
ई-पंचायत मिशन मोड प्रकल्पातील `सर्व्हिस प्लस` या सॉफ्टवेअरमुळं राज्यातील ३३ जिल्ह्यांतील २७,९२० ग्रामपंचायतींनी ऑनलाईन दाखले देण्यास सुरवात झालीय. ७ जानेवारीपासून याला सुरुवात झालीय आणि २० जानेवारीपर्यंत राज्यातील १०,४८० नागरिकांनी दाखल्यासाठी ऑनलाईन अर्जही केले आहेत. त्यातील ९८९३ जणांना दाखले मिळाले आहेत.
या सॉफ्टवेअरमुळं ग्रामपंचायत पातळीवर २५ हजार नवीन रोजगार उपलब्ध झाले आहेत. तसंच ग्रामपंचायतींचं उत्पन्नही वाढलंय. ग्रामपंचायत स्तरावर संगणक, प्रिंटर, कागद या साधनांसह एक ऑपरेटर नेमला जातो. या ऑपरेटरला दाखल्याच्या शुल्कामध्ये कमिशन दिलं जातं. दुर्गम भागातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या इंटरनेटची सुविधा नाही, त्या ठिकाणी लवकरच ही सुविधा अन्य मार्गानं देण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रयत्न सुरू आहे.
कसा भरायचा ऑनलाईन अर्ज
> सर्व्हिस प्लस या पोर्टलवर जायचं. लॉग इन केल्यानंतर त्याचा मोबाईलवर मॅसेज तसंच ई-मेल येतो.
> लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी दाखल्याचे नमुने आहेत.
> त्यातील हव्या त्या दाखल्यावर क्लिक करून आवश्यक त्या माहितीसह तो भरायचा.
> त्यानंतर एका दाखल्यासाठी असलेली २० रुपये इतकी फी भरायची. हे शुल्क ई-पेमेंट, डिमांड ड्राफ्ट, चेक, रोख रकमेत भरता येते. त्यानंतर किती दिवसांत तुमची कागदपत्रे तयार होतील, याचा मॅसेज येतो. त्यानंतर त्याची तुम्ही प्रिंट काढू शकाल. नाहीतर ई-मेलद्वाराही तयार झालेले कागदपत्र तुम्हाला मिळू शकेल.
कशाकशाचे मिळणार दाखले
जन्मनोंदणी प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणपत्र, रहिवासाचा दाखला आणि प्रमाणपत्र, विवाहाचा दाखला, नोकरी व्यवसायासाठी `ना हरकत` दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, नादेय प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी `ना हरकत` प्रमाणपत्र, कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचं प्रमाणपत्र, शौचालय दाखला, जॉब कार्ड, बांधकामासाठी अनुमती, नळजोडणी परवानगी, चारित्र्याचा दाखला इत्यादी...
या दाखल्यासाठी प्रत्येक वेळेस २० रुपये शुल्क आकारलं जातं. मात्र निराधार योजनेसाठीचा वयाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र आणि हयातीचा दाखला, हे दाखले मोफत दिले जातात. तेव्हा आता ग्रामसेवकाची हाजीहाजी न करता आपलं काम स्वत: करा तेही कोणताही ताण न घेता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.