पावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं

एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 5, 2012, 08:13 AM IST

www.24taas.com, मुंबई
एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.
पावसानं मुंबईकरांना सोमवारी चांगलंच झोडपलं. शहरासह उपनगरात जागोजागी पाणी साचलं होतं. मुंबई महानगरपालिकेनं 100 टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला होता. हा दावाही पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे फोल ठरला. रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला होता. त्यामुळे सकाळपासून घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
या पावसामुळे वांद्रयाच्या भारतनगर भागातल्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं. तसंच ब्रीमस्टोवॅडसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही एलफिस्टन परिसरातल्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरलंच. पावसामुळे एलफिस्टनच्या रस्त्यांची दुरवस्था झाली. तरीही मुंबईत जागोजागी पाणी तुंबल्यामुळे महापालिका फेल झाल्याचा दावा महापौरांनी मात्र खोडून काढलाय. मुंबईची लाईफलाईन केवळ एका मोठ्या पावसामुळे कोलमडली. त्यामुळे महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल झाली.