www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं आता आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे. गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा पालवे यांच्याविरोधात धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर यानिमित्तानं शिक्कामोर्तब झालय.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्याचं शल्य मनात बाळगून धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात दीड वर्षापूर्वी बंडाचं निशाण फडकावलं.. मात्र त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. अखेरीस तो त्यांनी दिला. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. धनंजय यांनी पक्षप्रवेश केल्यास त्यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची संधी दिली जाईल असं सांगत राष्ट्रवादीनेही धनंजय यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलंय.
खरं म्हणजे काका गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत तयार झालेल्या धनंजय मुंडे यांनी या निमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या साम्राज्यालाच आव्हान निर्माण केलंय. काकांकडून जिल्ह्याच्या राजकारणात धडे गिरवून धनंजय यांनी बीड जिल्ह्यावर जबरदस्त पक़ड निर्माण केलीय. आधी भाजप पक्षसंघटनेत जिल्हास्तरावर त्यांनी आपली पकड मजबूत केली. जिल्हा परिषदेवर निवडून आल्यावरही त्यांनी आपली ही ताकद कशी वाढती राहील याचीच काळजी घेतली. 127 पैकी 72 ग्रामपंचायतींवर धनंजय यांचं वर्चस्व आहे. या आकडेवारीतूनच त्यांची ताकद दिसून येतेय. मात्र त्यानंतर ग्रामपंचायत असो वा पंचायत समिती प्रत्येक निवडणुकीत धनंजय काकांवर वरचढ ठरले. तरीही तांत्रिक कारणाने त्यांना आमदारकीचा राजीनामा देता आला नव्हता. अखेरीस तो त्यांनी दिला. या निमित्ताने आता गोपीनाथ मुंडे यांची जिल्ह्यात कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीला जोरदार हत्यार मिळालंय. तसे संकेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेत. म्हणजे लोकसभेसाठी धनंजय यांना बीडमधून थेट गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्धच लढवलं जाऊ शकतं किंवा परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे पालवे यांच्याविरोधात उभं केलं जाऊ शकतं...
धनंजय यांनी लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवली तरी त्यांची लढत थेट काका किंवा चुलत बहिणीशीच होणार हे नक्की.... तसं झालं तर गेल्या निवडणुकीत 8 कोटी खर्च केल्याची कबुली देणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना यावेळी त्यापेक्षा मोठा खर्च करावा लागेल.... आणि धनंजयसाठी राष्ट्रवादीही मागे राहणार नाही.... म्हणजे बीडमध्ये पुन्हा पैशांचा धूर निघेल अशीच चिन्हं दिसतायत.... काकांच्या तालमीत तयार झालेला पुतण्याचं आव्हान अनुभवी गोपीनाथराव मुंडे कसं परतवणार याची चर्चा यानिमित्तानं सुरु झालीय.... पुढचं वर्ष-दीडवर्ष तरी बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष आणखी तीव्र होणार हे मात्र नक्की.....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.