मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केलीय. यावेळी, त्यांचं लक्ष्य ठरले ते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
राज्यातला जवळपास २० टक्के भूखंड भाजपनं आपल्या ताब्यात घेतलाय. राज्यातील वनसंपदा पतंजली समुहाला द्यायचा डाव वनमंत्री मुनगंटीवार यांनी आखलाय, अशी टीका करत बाबा रामदेव आणि भाजपचं साटंलोटं असल्याचं त्यांनी म्हटलंय. लवकरच वनौषधींच्या विक्रीसंदर्भात वनविभाग आणि पतंजली यांच्या सामंजस्य करार होणार असल्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं.
यावेळी, वनमंत्री मुनगंटीवार हे 'जंगल बुक'मधील 'मोगली' आहेत पण 'जंगल जंगल बात चली है, पता चला है', असं म्हणत त्यांचं बिंग फुटल्याचा दावा मलिक यांनी केलाय.
वनमंत्री @SMungantiwar हे 'जंगल बुक'मधील 'मोगली'. पण 'जंगल जंगल बात चली है, पता चला है' @nawabmalikncp
— NCP (@NCPspeaks) January 21, 2016
शिवसेनेनं सुरु केलाय इंग्रजीचा प्रचार
मदरशांमधील उर्दू, अरबी शिक्षणावर बंदी घालावी व हिंदी, इंग्रजी शिकवावे अशी मागणी शिवसेना करत आहे. परंतु, उर्दू हीदेखील भारतीय भाषा आहे, असं म्हणत शिवसेनेनं भारतीय भाषा सोडून इंग्रजीचा प्रचार सुरू केल्याचंही मलिक यांनी यावेळी म्हटलंय.
शिवसेनेच्या या भूमिकेवर सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.
महानगरपालिका निवडणूक
समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादी २०१७ मधील महानगरपालिकेची निवडणूक लढणार असल्याचं मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.