www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या ही महाराष्ट्र सरकारला आणि गृहमंत्र्यालयाला कमीपणा आणणारी बाब आहे, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
हा हल्ला कोणी घडवून आणला आहे. त्याच्याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिलेत. या घटनेच्या खोलात जाऊन तपास करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व सामान्य जनतेला या घटनेची माहिती मिळाली पाहिजे. तशी चौकशी पोलीस करतील, अशी माहिती अजित पवार यांनी या घटनेनंतर दिली.
दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दाभोलकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या शरीरात दोन गोळ्या आरपार गेल्या. जखमी अवस्थेत त्यांना ससून रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. दरम्यान, गृहमंत्री आर आर पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. तपास योग्य दिशेने व्हावा त्यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
नरेंद्र दाभोलकर यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी मला दिल्लीत कळाली आणि धक्काच बसला. एक अभ्यासू निष्ठावान विचारवंत आणि पूर्णपणे लोकशाही मार्गाने चळवळ उभी करणाऱ्या एका कार्यकर्त्याची अशा पद्धतीने हत्या होणे हा प्रबोधन परंपरेला आणि लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे, अशी प्रक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या परीवर्तनाच्या चळवळीतील त्यांचे योगदान हे प्रचंड आहे. एका निरोगी, समतावादी आणि विज्ञाननिष्ठ समाजाच्या ऊभारणीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतभेदांबद्दल कायम त्यांची चर्चेची तयारी असे. अशा विचारशील आणि कृतीशील माणसाचा असा अंत घडून येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना व त्यांच्या कार्याला अंतःकरणपूर्वक अभिवादन करते, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यांना या धक्क्यातून सावरण्याची बळ लाभो हीच प्रार्थना व्यक्त करते, अशी श्रद्धाजंली सुळे यांनी वाहिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.