मुंबई : 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.
मित्र जेव्हा मित्रासारखे वागत नाहीत व स्वार्थासाठी हाती खंजीर घेतात तेव्हा शिवरायांच्या विचाराने शिवसेनेला वाघनखांचा वापर करावा लागतो. मोदी यांच्या शिवप्रेमास आव्हान देण्याचा आमचा हेतू नाही, पण शिवरायांच्या महाराष्ट्राला आव्हान देण्याचे प्रयोग सुरू आहेत, म्हणून आम्ही ही बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती घेतली इतकेच!
अहो, हा महाराष्ट्र आहे! आमच्या शिवप्रेमाला आव्हान देऊ नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावले आहे व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असल्याने त्या धुरळ्यात अनेकजण गुदमरले आहेत. दिल्लीचा कारभार सोडून पंतप्रधान महाराष्ट्रातील गावागावांत जाहीर सभा घेत फिरत आहेत व रोज नवी आश्वासने देत आहेत. आम्हाला मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्यात अजिबात रस नाही, पण पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी महाराष्ट्रासाठी नेमके काय केले? हा प्रश्न राज्यातील ११ कोटी जनतेला पडला आहेच.
शरद पवार यांनी असे म्हटलेय, ‘नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, पण ते गुजरातच्या बाहेर पडले नाहीत.’ ‘मनसे’प्रमुखांची राजकीय ताकद किती हा संशोधनाचा विषय आहे, पण त्यांनीही एक भूमिका घेतली आहे, ती म्हणजे ‘पंतप्रधान होऊनही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत आहेत.
महाराष्ट्रातील गोष्टी गुजरातला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी आहे काय?’ असा त्रागा त्यांनी केला आहे. हे सर्व विचार आम्ही अनेकदा मांडले आहेत व इतरांना या प्रश्नी आता कंठ फुटला आहे. मोदी हे भाजपचे टोलेजंग नेतृत्व आहे. त्यामुळे असे गावोगाव फिरणे त्यांच्या इभ्रतीस शोभणारे नाही, पण भारतीय जनता पक्षाकडे मोदी यांच्याशिवाय दुसरे कोणतेच नाणे नसल्याने त्या नाण्याचा खणखणाट करीत भाजपवाले राज्यभर फिरत आहेत.
कॉंग्रेस राजवटीत जेव्हा अशा निवडणुका होत तेव्हा प्रचारसभांतून तेच तेच आणि तेच बोलणार्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका होत असे. मनमोहन यांची खिल्ली उडविण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. पंतप्रधानपदाचा ‘आब’ राखला गेला पाहिजे. पक्षाच्या प्रचारसभांना पंतप्रधान येणार म्हटल्यावर सुरक्षा, इतर व्यवस्था याचा मोठा तामझाम करावा लागतो व त्याचा भार शेवटी जनतेच्या तिजोरीवर पडतो. सोनिया गांधी, मनमोहन अशा प्रकारे सरकारी यंत्रणेचा वापर करीत होते व त्यावर प्रखर टीका त्यावेळी झाली आहे.
भाजपच्या दृष्टीने मोदी हे ‘स्टार’ नव्हेत तर ‘सुपरस्टार’ प्रचारक आहेत. मोदी यांच्या नावाचे माहात्म्य एवढे असेल तर त्यांनी राज्यात २५-३० सभा घेण्याऐवजी दिल्लीत बसून महाराष्ट्रातील मतदारांसाठी एखादे निवेदन प्रसिद्ध केले असते तरी चालले असते व लोकांनी त्यांचे नक्कीच ऐकले असते. मोदी यांच्या फोटोसह पान-पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. तरीही मोदी २५-३० सभा घेत आहेत.
अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करण्याच्या धमक्या कश्मीरातील अतिरेकी देत होते. त्यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबईत बसून एक निवेदन देत व त्यामुळे अतिरेक्यांची गाळण उडत असे. हे अनेकदा घडले आहे. लोकांना पेटविण्यासाठी व अनेकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांचे चार ओळींचे निवेदन पुरेसे ठरत होते.
मोदी यांची शिवसेनाप्रमुखांवर श्रद्धा असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने आम्ही हे दाखले दिले इतकेच. तीच गोष्ट भाजपवाल्यांच्या शिवछत्रपतींवरील प्रेमाची. सध्या या मंडळीची शिवरायांवरील भक्ती अचानक दाटून आली आहे, पण महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात एकाही विषयावर ते बोलत नाहीत. अखंड महाराष्ट्र, सीमा प्रश्न, मुंबईचे महत्त्व याबाबत तर त्यांच्या तोंडास टाकेच घातले आहेत. राज्याच्या भाजपप्रमुखांनी तर भलतेच प्रश्न उपस्थित केले.
शिवजयंतीच्या वर्गण्या हा हप्तेबाजीचा प्रकार असल्याचे त्यांनी ठोकून दिले. हा शिवाजी महाराजांचा अपमानच आहे. कोळसा खाण घोटाळ्यातील लोक शिवसेनेच्या तिजोरीत पैसा जमा करीत नाहीत. त्यामुळे ज्याला ते ‘हप्ते’ म्हणतात त्याच वर्गणीतून उत्सव साजरे करावे लागतात व शिवरायांच्या विचारांची गर्जना करावी लागते.
फडणवीस यांनी अत्यंत नम्र भावात असे सांगितले की, ‘शिवसेनेचा नक्की शत्रू कोण ते ठरवावे? शिवसेनेला कुणाशी लढायचे आहे? ते सांगावे?’ महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोणीही असूद्यात, शिवसेना त्यांना दुश्मन मानते. मित्र जेव्हा मित्रासारखे वागत नाहीत व स्वार्थासाठी हाती खंजीर घेतात तेव्हा शिवरायांच्या विचाराने शिवसेनेला वाघनखांचा वापर करावा लागतो. मोदी यांच्या शिवप्रेमास आव्हान देण्याचा आमचा हेतू नाही, पण शिवरायांच्या महाराष्ट्राला आव्हान देण्याचे प्रयोग सुरू आहेत, म्हणून आम्ही ही बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती घेतली इतकेच!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.