मोदींची आज मुंबईत ‘महागर्जना’, १० हजार चहावाल्यांना निमंत्रण

उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी आज मुंबईत `महागर्जना` करणार आहेत. दिल्लीच्या सिंहासनावरून काँग्रेसला खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदींना मराठी मावळ्यांची दमदार फौज सोबतीला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या भूमीत मोदी काय महागर्जना करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 22, 2013, 08:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी आज मुंबईत `महागर्जना` करणार आहेत. दिल्लीच्या सिंहासनावरून काँग्रेसला खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदींना मराठी मावळ्यांची दमदार फौज सोबतीला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या भूमीत मोदी काय महागर्जना करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
एक चेतना... एक धारणा... महागर्जना... ही कॅचलाईन आहे नरेंद्र मोदींच्या मुंबईत होणाऱ्या महासभेची... दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी प्रचाराची तुतारी नरेंद्र मोदी फुंकणार आहेत. उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्राचा गड काबीज करण्यासाठी मोदींनी मोर्चेबांधणी चालवलीय... २७२ खासदारांचा बहुमताचा आकडा पार करायचा असेल तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून खासदारांची रसद वाढवली पाहिजे, हे वृत्तीनं गुजराती असलेल्या हिशेबी मोदींना पक्कं ठाऊक आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. सध्या काँग्रेसचे १७, राष्ट्रवादीचे ८, भाजपचे ९, शिवसेनेचे ११ तर बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष असे प्रत्येकी १ खासदार आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रात चौथ्य़ा क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या वाढवणं, हे मोदींसाठी मोठं आव्हान असणार आहे.
महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या नितीन गडकरी गट आणि गोपीनाथ मुंडे गट असे सरळसरळ दोन तट पडलेत. भाजपमधील ही अंतर्गत गटबाजी निपटून काढल्याशिवाय मोदींचं आणि पर्यायानं भाजपचंही स्वप्न साकार होणार नाहीय. त्यातच महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती आहे. परंतु युतीमध्ये सुखाचा संसार कमी आणि एकमेकांची ऊणीदुणी काढण्यावरच जास्त भर दिला जातोय. मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढतानाच भाजप नेत्यांची निम्मी शक्ती खर्च होतेय. त्यामुळं शिवसेना नेतृत्वाला विश्वासात घेण्यासाठी मोदींना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे...
रामदास आठवलेंच्या रूपानं रिपब्लिकन पक्षाची ताकद मिळाल्यानंतर युती आता महायुती झालीय. मात्र त्याचा म्हणावा तितका राजकीय फायदा महायुतीला अद्याप झालेला नाही. आगामी निवडणुकीपर्यंत ही भीमशक्ती टिकवून ठेवण्याचं कसब पणाला लागणार आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही चौथा भिडू म्हणून महायुतीत घ्यावं, असाही एक विचार भाजपमध्ये आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची चांगलीच जानपहचान आहे. त्यामुळं मनसेला महायुतीत आणण्यासाठी मोदी आपलं वजन वापरणार का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील यशामुळं भाजपच्या उत्साहाला आणखी उधाण आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आजची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी भाजपनं तन मन धन लावून तयारी केलीय. मोदींची मुंबईतली सभा भव्यदिव्य व्हावी, यासाठी वेगवेगळ्या शकला लढवल्या जातायत. कधीकाळी चहावाल्याचं काम करणाऱ्या मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईतील १० हजार चहावाल्यांना खास निमंत्रण पाठवण्यात आलीत. त्याशिवाय महाराष्ट्रभरातून भाजप कार्यकर्त्यांच्या फौजाही आज मुंबईत धडकणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.