राष्ट्रवादीची लोकसभेसाठी संभाव्य यादी....

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच 22 जागांवर चर्चा करून राष्ट्रवादीनं एका अर्थी आपल्या मित्रपक्षाला इशारा दिलाय. तर दुसरीकडे माढ्यातून कुणाला तिकिट द्यायचं, याचा पक्षांतर्गत पेच राष्ट्रवादीला सोडवावा लागणार आहे...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 6, 2014, 11:14 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच 22 जागांवर चर्चा करून राष्ट्रवादीनं एका अर्थी आपल्या मित्रपक्षाला इशारा दिलाय. तर दुसरीकडे माढ्यातून कुणाला तिकिट द्यायचं, याचा पक्षांतर्गत पेच राष्ट्रवादीला सोडवावा लागणार आहे...
लोकसभा निवडणुकीची चाहूल आता सर्वच राजकीय पक्षांना लागलीये. मात्र उमेदवार निवडीच्या तयारीत राज्यातल्या सत्ताधारी आघाडीत `धाकटा भाऊ` असलेल्या राष्ट्रवादीनं काँग्रेसवर कुरघोडी केल्याचं दिसतंय. दोन दिवस मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत लोकसभेच्या 22 जागांच्या उमेदवारीवर खल झाला... मात्र यात चर्चा रंगली ती प्रामुख्यानं शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचीच... NCPचे दोन प्रबळ नेते माढ्यावर दावा करत असल्याचं चित्र आहे. रामराजे नाईक-निंबाळकर माढा किंवा साता-यातून इच्छुक आहेत. मात्र पक्षाच्या नेहमीच विरोधात बोलणाऱ्या
खासदार उदयनराजे भोसले यांनाच साताऱ्यातून पुन्हा उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांनाही माढ्यातून निवडणूक लढण्यात रस आहे. पक्षानं मात्र याबाबत मौन बाळगणंच पसंत केलंय... पवार जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणण्यासाठी पक्ष काम करेल, असं प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
माढ्याचा तिढा सोडवण्याचं आव्हान पक्षापुढे असलं, तरी या बैठकीतून NCPनं आपल्या मित्रपक्षाला स्ट्राँग मेसेज दिलाय. राष्ट्रवादीला 19 जागा देण्याचं काँग्रेसमध्ये घाटत असलं, तरी 22 जागांचा आढावा घेऊन NCPनं यात तडजोड होणार नाही, असं स्पष्ट शब्दांत सुनावलंय.
एकीकडे जागावाटपाचा प्रश्न केंद्रीय नेते घेतील, असं सांगत मुंबईत झालेल्या बैठकीत परस्पर आपल्या वाट्याच्या 22 जागांवर चर्चा करून टाकायची... या खास राष्ट्रवादी शैलीला आता काँग्रेस कसं प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे...
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
- उदयनराजे भोसले - सातारा
- छगन भुजबळ - नाशिक
- प्रफुल्ल पटेल - भंडारा गोंदिया
- लक्ष्मण जगताप - मावळ
- संजीव नाईक - ठाणे
- आनंद परांजपे - कल्याण
- अरूण गुजराथी - जळगाव
- रवींद्र पाटील - रावेर
- सूर्यकांता पाटील - हिंगोली
- विजय भांबळे - परभणी
- संजय दीन पाटील - मुंबई उत्तर पूर्व
- पद्मसिंह पाटील - उस्मानाबाद
- धनंजय महाडीक - कोल्हापूर
- सुप्रिया सुळे - बारामती
- जयंत पाटील - हातकणंगले
- जयदत्त क्षीरसागर - बीड
- रमेश आडसकर - बीड
- सुरेश धस - बीड
- विजयसिंह मोहिते पाटील - माढा
- राम राजे निंबाळकर - माढा
- बबनराव पाचपुते - अहमदनगर
- राजीव राजळे - अहमदनगर
- मधुकर पिचड - दिंडोरी
- ए.टी. पवार - दिंडोरी
- राजेंद्र गवई - अमरावती
- दिनेश बूब - अमरावती
- गुणवंत देवकरे - अमरावती
- राजेंद्र शिंगणे - बुलडाणा
- रेखाताई खेडकर - बुलडाणा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.