मुंबई : राज्यात सर्व विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर प्रश्नांवर संघर्ष यात्रा काढणार आहेत, त्यामुळे ती होऊ नये यासाठी भाजपकडून अफवा पसरविण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेची कायमची डोकेदुखी संपवण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ३० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तशी चर्चाही बैठकीत झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी या वृत्तात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसेच पक्षाशी एकनिष्ट आहेत, त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरूवून भाजपला अर्थसंकल्पीय अधिवेशन कसेबसे पूर्ण करायचे आहे, त्यामुळे केविलवाणा प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येत आहे.
तसेच मनी बिलावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी त्यांनी १९ आमदारांचे निलंबन केले, तसाच आता हा प्रय्तन असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
गेल्या २५ वर्षात सर्वाधिक संख्याबळ असलेले हे सरकार आहे, पण ते टिकाविण्यासाठी नेहमी काही ना काही करावे लागत असल्याने हे दुर्बल सरकार असल्याची टीका तटकरे यांनी केली.