www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही. राज्यात अजितदादा हे सक्षम आहे, त्याचा प्रशाकीय अनुभव दांडगा आहे आणि तो भाषणही चांगलं करतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले आहे. आमच्या भाऊ बहिणीमध्ये अनेक जणांना फूट पाडण्याचे प्रयत्न केले. पण पवारांचा रक्त आहे कितीही प्रयत्न केला तरी आमच्या वाद होणार नाही, असेही आवर्जुन सांगितले.
‘गोवादूत’ वृत्तपत्राचे संपादक सचिन परब यांच्या `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रकाशन सोहळ्याला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सुप्रिया सुळे आणि मनपातील स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे उपस्थित होते. पुस्तकावर पुढारी वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे आपले मत व्यक्त केले.
सचिन परब यांनी लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये उत्तर प्रदेशात तरूण अखिलेश यादव मुख्यमंत्री होतो, आपला अखिलेश कुठे असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचा धागा धरून विनोद तावडे यांनी सुप्रिया सुळे यांना चिमटा काढला की, दिल्लीत शीला दीक्षित, पूर्वेला ममता, दक्षिणेत जयललिता होत्या. पश्चिमेत सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी होती. पण त्यांनी दादांना पुढे केलं.
यावर उत्तर देताना, सुप्रिया सुळे यांनी सांगितले, की लाल दिव्याच्या गाडीसाठी दादाला कधी दुखवणार नाही. गेली ४० वर्षे लाल दिव्याची गाडी पाहते आहे. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना झोप नव्हती. विरोधी पक्ष नेत्याचं काय एक आंदोलन करायचे हेडलाइन द्यायची आणि शांत झोपायचं. गेली १० वर्ष तुम्ही हेच केले असं मी म्हणत नाही, असा टोला त्यांनी तावडेंना मारला.
`माझं आभाळ` या पुस्तकाचे प्रकाशन विनोद तावडे, सुप्रिया सुळे आणि राहुल शेवाळे या तरूण पिढीच्या नेत्यांच्या हस्ते करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.