मुंबई : अपॉईंटमेंटशिवाय भेटणार नाही, हे नवं धोरण आहे उद्धव ठाकरे यांचं... सत्ता समोर दिसताच शिवसेना नेत्यांच्या येरझाऱ्या वाढायला लागलेल्या दिसतायत. पण, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे नॉट रिचेबल झालेत.
दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना आज मातोश्रीवरुन 'यू टर्न' मारावा लागला. कारण उद्धव साहेबांनी त्यांना भेट नाकारली. भाजप-शिवसेनेचं सरकार येणार हे समोर दिसू लागल्यावर लॉबिंगसाठी मातोश्रीवर गर्दी वाढायला लागलीय... आणि म्हणूनच मातोश्रीची तटबंदी आणखी भक्कम करण्यात आलीय. मातोश्रीवरचे कायदेही कठोर करण्यात आलेत. अपॉईंटमेंटशिवाय कुणालाही भेट नाही, असं स्पष्ट करत उद्धवसाहेब नॉट रिचेबल झालेत.
सत्तेतल्या पदांची खिरापत कुणाला मिळणार? याची यादी मातोश्रीवर तयार झालीय. या यादीतलं कॅबिनेट मंत्रिपद, राज्यमंत्रिपद, एखादं महामंडळ तरी आपल्या नावावर व्हावं, यासाठी शिवसेना नेत्यांच्या मातोश्रीवरच्या चकरा वाढल्यात. शिवसेनेला पाच कॅबिनेट आणि सात राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण, बहुतांश कॅबिनेट मंत्रिपदं विधानपरिषदेकडेच जाणार असल्यानं विधानसभेतले आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तसंच शिवसेनेच्या वाट्याला कमी महत्त्वाची खाती आल्याचंही बोललं जातंय. दिवसभरात सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, गजानन किर्तीकर या नेत्यांनी मातोश्रीची वारी केली. त्यापैकी सुभाष देसाईंना उद्धव ठाकरे भेटले. पण इतर नेत्यांची खरंच भेट झाली का? हे उद्धव ठाकरे आणि त्या नेत्यांनाच माहीत. पण कुठलीही नाराजी नसल्याचं नेते सांगतायत.
अपॉईंटमेंटशिवाय भेट नाही, या उद्धव यांच्या भूमिकेमुळे मातोश्रीच्या पूर्व इतिहासाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी उद्धव यांनी भेट नाकारल्यानं अनेकांनी थेट पक्षालाच जय महाराष्ट्र केलाय. आता सत्ता समोर उभी असल्यानं तसं होण्याची शक्यता नाही. पण, जोपर्यंत मंत्रिमंडळाचा फायनल पेपर फुटत नाही, तोपर्यंत मातोश्रीची तटबंदी फोडणं नेत्यांसाठी कठीणच असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.