टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

Updated: Nov 1, 2015, 09:12 PM IST
टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ title=

मुंबई : मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

उच्च न्यायालयाने एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने येत्या काही दिवसात नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळे नाशिककरांसमोर एक नवीन संकट उभे आहे.

आर्थिक बोजा लक्षात घेता मुंबईतील पाच नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमधून छोटय़ा वाहनांना सूट देण्याचा निर्णय घेण्याचे राज्य सरकारने सध्या तरी टाळलेय. परिणामी मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

मुंबईतील पाच नाके आणि पुणे द्रुतगती मार्गावरील टोलबंदीबाबत विचार करण्याकरिता अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीला ३१ ऑक्टोबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपली असली तरी शासनाने अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही.
 
राज्य शासनाने दिलेल्या मोठ्या सवलती आणि करारानुसार राज्य सरकार वागत नसल्याने जून महिन्यात मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र कुंभमेळ्याची कामे प्रशासनाच्या डोक्यावर असल्याने दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. टोलचा भडका उडू नये म्हणून लोकसभा निवडणुकापूर्वी न्यायालयाचा आदेश असतानाही दरवाढ पुढे ढकलण्यात आली. 

त्यामुळे टोल नाक्याला दरमहा १० कोटी रुपये तोटा सहन करावा लागतोय. यासाठी राज्य शासनाने ही भरपाई द्यावी म्हणून एल अॅन्ड टी कंपनीने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिल्याने येत्या काही दिवसात टोल मध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीय. 

येत्या काही दिवसात जिल्ह्याधिका-यांच्या सोबत बैठक करून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. यामुळे नाशिक शहरापासून राष्ट्रीय महामार्गावर चक्क दोन टोलच अंतर चाळीस किलोमीटरपेक्षा कमी रहाणार आहे. सव्वाशे रुपयांचा टोल डबल झाल्यास नाशिकहून चांदवडच्या रेणुका देवीचं दर्शन करून येण्यासाठी किमान पाचशे रुपये खर्च येणार आहे.

राज्य सरकारने जरी ग्रामीण भागातील रस्त्यांवर टोल माफ केला असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोलचा फास आता हळूहळू आवळला जातोय. या टोलवाढीला पुन्हा राजकीय रंग चढणार असून येत्या काळात यावरुन पुन्हा मोठा वाद होण्याची शकयता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.