राज-उद्धव एकत्र येण्याच्या बातमी मागचं राजकारण

 महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पण या बातम्या विनाकारण भाजपकडून पेरल्या जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

Updated: Jan 27, 2017, 08:11 PM IST
 राज-उद्धव एकत्र येण्याच्या बातमी मागचं राजकारण  title=

मुंबई :  महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. पण या बातम्या विनाकारण भाजपकडून पेरल्या जात असल्याची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

काय फायदा होईल भाजपला 

शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी बातमी आली की मराठी मतांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडूनच अशा प्रकारची टूम उठवली जात आहे. 

मनसेला काय फायदा 

युती तुटल्याने कुठेही चर्चेत नसलेल्या मनसेला आता महत्त्व निर्माण झाले आहे. मनसेला कोण जवळ करणार भाजप का शिवसेना अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात चर्चेतून बाहेर पडलेल्या मनसेला पुन्हा चर्चेत येण्यास यामुळे संधी मिळाली आहे. यामाध्यमातून एक दोन नगरसेवकपद आपल्या पारड्यात पडतील असे मनसेला वाटत आहे. 

चंदूमामांना पुन्हा महत्त्व 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी पुन्हा मनोमिलनासाठी प्रयत्न केल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर पसरविल्या जात आहे. पुन्हा एकदा चंदूमामांच्या नावाने नवी राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदार आता शहाणा झाला आहे. तो अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही असेही त्यांनी सांगितले. 

शिवसेनेला तोटा...

अशा प्रकारची माहिती प्रसारमाध्यम, सोशल मीडिया यात  फिऱल्याने मराठी मनात पुन्हा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रस्ताव आल्यास युती करण्यास तयार म्हटले होते. त्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हात जोडून सूचक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून उद्धवजींच्या मनात काय आहे हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे अशी कोणतीही युती होणार नाही, असे या नेत्याने स्पष्ट केले आहे. 

काय आहे बातमी....

भाजपशी काडीमोड झाल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय समझोता होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  भाजपची घोडदौड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात.

शिवसेनेनं भाजपशी युती तोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. दोन्ही ठाकरे बंधू पर्यायानं एकत्र आले नाहीत किंवा शिवसेना आणि मनसेची थेट युती झाली नाही तरी पडद्याआडून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय समझोता होईल, अशी माहिती समोर येत आहे. 

भाजपची ताकद असलेल्या वॉर्डांमध्ये वेगळी रणनिती आखण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं समजतंय... शिवसेना-मनसे युतीच्या दृष्टीनं मातोश्रीवरुनही चाचपणी झाल्याचं कळतंय. मात्र पहिल्या काही बैठकानंतर आता शिवसेनेकडून पुन्हा प्रतिसाद थंडावलाय. मात्र मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये आणि भाजपचा महापौर सत्तेवर येऊ नये, यासाठी येत्या दोन दिवसांत राज ठाकरे धक्कादायक निर्णय जाहीर करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.