पायही गेले आणि जोडीदाराचा हातही सुटला!

मोनिका मोरेसारखी अनेक उदाहरणं या मुंबईत मिळतील... ठाण्यातले प्रशांत महाजन हे त्यापैकीच एक... १९९९ मधला तो दिवस आठवला की अजूनही त्यांचा थरकाप उडतो... एका अपघातानं त्यांचं अख्खं आयुष्य उध्वस्त केलं... आणि हे सगळं घडलं त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 16, 2014, 10:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोनिका मोरेसारखी अनेक उदाहरणं या मुंबईत मिळतील... ठाण्यातले प्रशांत महाजन हे त्यापैकीच एक... १९९९ मधला तो दिवस आठवला की अजूनही त्यांचा थरकाप उडतो... एका अपघातानं त्यांचं अख्खं आयुष्य उध्वस्त केलं... आणि हे सगळं घडलं त्यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी.
भांडुपच्या सरस्वती विद्यालयात शिक्षक असलेले प्रशांत महाजन सध्या कृत्रिम पायांच्या आधारावर उभे आहेत. त्यांना झालेल्या अपघातातून हळूहळू ते सावरतायत. पण, आजही त्यांना तो भयानक दिवस आठवतो. प्रशांत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होते. लग्नाच्या आदल्या उरलेल्या पत्रिका वाटण्यासाठी ते डोंबिवलीहून निघाले... प्लॅटफॉर्मवरच्या खड्ड्यांमध्ये त्यांचा पाय अडकला आणि ते ट्रॅकवर पडले. या अपघातात प्रशांत दोन्ही पाय गमावले. तब्बल दीड तास ते प्लॅटफॉर्मवर पडून होते, पण साधे प्राथमिक उपचारही त्यांना मिळाले नाहीत.
त्यांना रेल्वेने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. पण तिथेही सर्जन, डॉक्टर नसल्यानं तब्बल चार तासांनी त्यांच्यावर उपचार झाले. या सगळ्या प्रकारानंतर प्रशांत यांचं लग्नही मोडलं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे त्यांना आठ महिने खाजगी रुग्णालयात काढावे लागले आणि त्यांच्या लग्नासाठी जमवलेले सगळे पैसे या उपचारांसाठी खर्च करावे लागले.
प्रशांत यांना वेळेवर म्हणजे साधारण चार तासांत योग्य उपचार मिळाले असते... तर त्यांचे पाय जोडणंही शक्य होतं... पण, सगळ्या व्यवस्थेच्या अक्षम्य हलगर्जीपणापायी प्रशांत यांना पाय गमवावे लागले. प्रशांत हळूहळू सावरतायत. कृत्रिम पायावर आता ते उभे आहेत...
हे सगळं घडलं ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरच्या खड्ड्यांमुळे... आता रेल्वे घाटकोपरचा खड्डा बुजवतेय. प्रशांत यांच्या या अपघाताची कहाणी १९९९ मधली..... आज त्याला पंधरा वर्षं उलटली... पण रेल्वेला प्लॅटफॉर्मवरचे आणि प्लॅटफॉर्मजवळचे साधे खड्डेही बुजवता आले नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.