www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. तर चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मिलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लांगलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आऱ.पाटील यांनीही सकाळी चैत्यभूमीवर हजेरी लावली. लाखो अनुयायींसाठी शिवाजी पार्कवर पालिकेच्यावतीने सोय करण्यात आलीय. तसंच त्यांना सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनासह विविध सेवाभावी संस्थाही सरसावल्यात.
दादर रेल्वे स्टेशनपासून ते चैत्यभूमीपर्यंतच्या रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहणारे फलक लागलेत. शिवाय महामानवाचे संदेश देणारे साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल्सवर मांडलंय. आज दिवसभर चैत्यभूमीवर महामानवाच्या नावाचा घोष सुरु राहणार आहे.
गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरणारे सांगलीतले प्रसिद्ध कलाकार अदमअली मुजावर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगळी आदरांजली अर्पण केलीये. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत त्यांनी महामानवाची १०० फुट बाय १५० फुटांची भव्य रांगोळी साकारलीये. सी. आर. सांगलीकर फाऊंडेशनच्या सहाकार्यानं मुजावर यांनी ही भव्य रांगोळी रेखाटलीये... या रांगोळीची नोंद गिनीज बुकसह लिम्का बुक, एशिया आणि इंडिया या चार रेकॉर्ड बुक्समध्ये होणार आहे. मुजावर यांनी यापूर्वी सहा वेळा रांगोळीचा विश्वविक्रम केलाय.
इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन करण्यासाठी आग्रही असलेल्या आरपीआयच्या रामदास आठवलेंनी अखेर इंदू मिलच्या बाहेरच भूमीपूजन केलं. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. स्मारकाचं काम लवकर मार्गी लावण्याची मागणी रामदास आठवलेंनी केलीय. सरकारनं जर २६ जानेवारीपर्यंत भूमीपूजन केलं नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रामदास आठवलेंनी सरकारला दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.