www.24taas.com, मुंबई
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज मुंबई दौ-यावर आहेत. उपाध्यक्षपदाची सुत्र स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. सकाळी त्यांच काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये आगमन झालं.
या दौ-यात ते पक्षबांधणीच्या दृष्टीनं पदाधिकारी आणि आमदार, खासदारांशी चर्चा करत आहेत. या बैठकीत मुंबईतील लोकसभा मतदारसंघनिहाय पदाधिका-यांशी त्यांनी संवाद साधला आहे. प्रत्येक दोन महिन्यांनंतर ब्लॉक समितीच्या बैठका घ्या, अशा बैठकांमुळं पक्षात संवाद वाढेल, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय. मुंबई प्रदेश कॉँग्रेस समितीचं अध्यक्षपदही सध्या रिक्त आहे, त्यामुळे याबाततही ते मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार होते. पक्षबांधणीसाठी राहूल गांधींकडून पदाधिका-यांना विशेष कानमंत्र देण्यात आला.
राहुल गांधी यांच्या मुंबई दौ-यात काँग्रेस पदाधिका-यांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांच्याविरोधात तक्रार केली. मोहन प्रकाशांविरोधात असलेली नाराजी राहुल यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना राहुल गाँधी आणि काँग्रेस आमदार आणि खासदारांचे कान टोचले. पक्षात शिस्त हवी, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपादाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. लवकरच अध्यक्षाची निवड करण्यात येईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. या बैठकीकडे गुरुदास कामत यांनी मात्र पाठ फिरवली.