मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Updated: Sep 17, 2014, 06:17 PM IST
मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे title=

मुंबई: सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

शनिवारी एका मुलाखतीदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, १९९५ मध्ये भाजप - सेनेचे सरकार आलं तेव्हा उद्धव यांचा सरकारमध्ये सहभाग नव्हता, असा टोमणा मारला होता. त्यामुळं खवळलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' अशा म्हणीप्रमाणं असून ते जेव्हा राज्यात मुख्यमंत्री बनून आले तेव्हा त्यांच्याकडे कोणत्या अनुभवाची डिग्री होती? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना तेव्हा सर्व तालुके माहीत नव्हते अथवा पश्चिाम महाराष्ट्रातील स्वपक्षीय आमदारांची नावंही माहीत नव्हती. केंद्रातील राज्यमंत्रीपदाची कारकुनी हा जर अनुभव असेल तर मंत्रालयातील ‘डेस्क ऑफिसर’चा अनुभव जास्त म्हणावा लागेल, अशी टीका लेखात करण्यात आली आहे. 

ज्यांनी अनुभवाचे ढोल वाजवले, त्या सर्वांनी देशाचं आणि राज्याचं दिवाळंच काढलंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची गादी गरम केली, मात्र त्याचा फायदा ना गादीला झाला ना महाराष्ट्राला असं सांगत गादीत फक्त भ्रष्टाचाराचे ढेकूण झाल्याचं लेखाच म्हटलंय. हे ढेकूण मारण्यासाठी येत्या निवडणुकीत जनता फवारणी करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अडीचेक वर्षांच्या अनुभवाचं सर्टिफिकेट आता कायमचं ‘फ्रेम’ करून घरीच लावून ठेवा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.