www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.
राज्य सरकार प्रत्यक्ष टोल वसूल करत असलं तरी मुंबईतल्या रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. त्यामुळे टोलमधून राज्य सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रत्यक्ष रस्त्यांच्या देखभालीवर खर्च होतो का? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असल्याचं शेवाळेंनी आपल्या पत्रात म्हटलंय.
`इस्टर्न फ्री वे`साठी टोल घेण्यात येणार नसल्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. मात्र, प्रत्यक्षात मुंबईत प्रवेश करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण टोल वसूल करत नाही मात्र राज्य सरकार टोल वसुली करते. त्यामुळे राज्य सरकारची ही घोषणा फसवी ठरल्याचंही त्यांनी म्हटलंय.
तसंच मुंबईबाहेरच्या रस्त्यांच्या कामांची किंवा अन्य प्रकल्पांची किंमत टोलच्या रुपानं राज्य सरकारनं वसूल केली असून आजही मुंबई शहरात येण्या-जाण्यासाठी वाहनांवर टोल आकारला जातोय. मात्र, मुंबई महापालिका रस्त्यांच्या डागडुजीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिका कुठल्याही प्रकारचा टोल आकारत नाही. याचं अनुकरण करून राज्य सरकारनंही यापुढे टोल घेणं बंद करावं अशी मागणी राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.